चोरीच्या विविध घटनांमध्ये 6 लाख 33 हजार 220 रुपयांच्या ऐवजावर डल्ला
नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड येथे एका शिक्षकाचे घरफोडून चोरट्यांनी 4 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. सिंदखेड येथे एका घरात घुसून चोरट्यांनी 1 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. इतवारा भाजी मार्केटमधून 30 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे, मोर चौकातून 19 हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेला आहे. सिडको परिसरातील बीएसएनएल कार्यालयातून 70 हजार रुपये किंमतीचे केबल चोरीला गेले आहे. तरोडा नाका येथे 6 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये एकून 6 लाख 33 हजार 220 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
महेश्र्वरी बाबूराव धनगावकर या शिक्षकाचे घर लोहा नांदेड रस्त्यावर सोनखेड येथे आहे. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता ते आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून नोकरीवर गेल्यानंतर कोणी तरी चोरट्यांनी हे घर फोडले. तक्रारीत लिहिल्याप्रमाणे 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. या ऐवजाची किंमत 4 लाख 5 हजार रुपये आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर हे अधिक तपास करीत आहेत.
किरण विठ्ठलराव राऊत रा.करंजी ता.माहूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता ते आणि त्यांचे कुटूंबिय घराचे दार उघडे ठेवून झोपी गेले. 1 सप्टेंबरच्या पहाटे 3 वाजता घरात चोरी झाल्याचे दिसले. घरातून सोन्या-चांदीचे दागिणे 52 हजार 220 रुपयांचे, रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 1 लाख 2 हजार 220 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सिंदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भोपळे अधिक तपास करीत आहेत.
किशोर विठ्ठलराव उत्तरवार यांची दुचाकी गाडी त्यांनी इतवारा भाजीमार्केट येथील मेहुण्याच्या घरासमोर 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता उभी केली. 25 मिनिटाच्या आत ही दुचाकी चोरीला गेली आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार रमेश गोरे अधिक तपास करीत आहेत.
बिरबल प्रभु सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता ते मोर चौकातून जात असतांना त्यांच्या शर्टच्या खिशातील 19 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
बीएसएनएल कार्यालय सिडको नांदेड येथील उपविभागीय अभियंता निशांत प्रकाश एंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑगस्टच्या सायंकाळी 7 ते 1 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेदरम्यान बीएसएनएल कार्यालयातील 200 मिटर लांब केबल वायर 70 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार रामचंद्र पवार अधिक तपास करीत आहेत.
सुदाम शामराव चव्हाण हा ऍटो चालका दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 5 ते 6 यावेळेदरम्यान तरोडा नाका मालेगाव रस्ता येथे आपला मालवाहु ऍटो घेवून थांबला होता. या दरम्यान कोणी तरी त्याच्या खिशातील 5 हजार रुपये रोख रक्कम व 1 हजारांचा मोबाईल असा 6 हजारांचा ऐवज चोरीला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कळणे अधिक तपास करीत आहेत.
सोनखेडमध्ये शिक्षकाचे घरफोडून चार लाखांचा ऐवज लंपास