नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर ते काब्दे हॉस्पीटल या रस्त्यावर महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. शासनाने मान्यता दिलेल्या नियमावलीप्रमाणे तेथे एकही थर टाकण्यात येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे गुणवत्ता पथक कशासाठी आहे हा प्रश्न समोर आला आहे.
रस्त्यांच्या कामकाजांमध्ये कोणत्या पध्दतीने तो तयार व्हावा, त्यात कोणते साहित्य वापरावे, त्या साहित्याची साईज काय असावी या संदर्भाने कालच गंगापुरचे आमदार प्रशांत बंब यांनी बरीच मोठी माहिती दिली. या पार्श्र्वभूमीवर आज सकाळी डॉ.आंबेडकर नगर ते काब्दे हॉस्पीटल या रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामकाजाची पाहणी केली असता कोणत्याही नियमावलीचा आधार नसलेले काम येथे सुरू आहे. रस्ता तयार करतांना त्याचा पुढील 20 वर्षाचा विचार करून तो रस्ता तयार व्हायला हवा. पण या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजामध्ये हा रस्ता तयार झाल्यावर किती दिवस टिकेल याचीच चिंता वाटायला लागली आहे. संबंधीत गुत्तेदार नियमावलीला ठेंगा दाखवून कोणाच्या जोरावर हे रस्त्याचे काम करत आहे हा एक न समजणारा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

रस्ता तयार करतांना त्याला वेगवेगळ्या साहित्याचे वेगवेगळे थर देवून त्यावर दबाई करणे आवश्यक आहे. सोबतच त्यानंतर दुसऱ्या साहित्याचे थर लावून ते अशा पध्दतीने तयार झाले पाहिजे. ज्यावर प्रहार मारली तर ती प्रहार पुन्हा यावी याचा अर्थ त्या कामामधील मजबुती दिसेल. सध्या सुरू असलेल्या डॉ.आंबेडकरनगर ते काब्दे हॉस्पीटल या रस्त्यावर अशा कोणत्याही स्वरुपाचे काम होत नाही त्यामुळे हा रस्ता फक्त दाखविण्यासाठी तयार केला आहे. त्यातील मजबुतीला काही महत्व नाही असाच त्याचा अर्थ दिसतो. पुर्वी असलेल्या रस्त्याची कोणतीही खुदाई न करता असलेल्या रस्त्यावरच पुन्हा कॉंक्रीटचा थर टाकून हा रस्ता तयार होत आहे. यामुळे त्या रस्त्यात मजबुती येण्याचा कांही एक विषय नाही.