नांदेड(प्रतिनिधी)-अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांनी शिफारस केल्यानंतर गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न यासाठी 9 गुन्हे आणि सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत करण्यासाठी 11 गुन्हे याबाबत काम करणारे 20 पोलीस अधिकारी आणि 61 पोलीस अंमलदार अशा 81 जणांना राज्यभरात बक्षीस जाहीर केल्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेनंतर विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके यांनी जारी केले आहेत. या बक्षीसांमध्ये नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह चार जणांचा समावेश आहे. नांदेड येथून बदलून गेलेले पोलीस निरिक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना सुध्दा या बक्षीसांमध्ये आपला ठसा उमटवता आला आहे.
राज्यात पोलीस विभागात काम करणाऱ्या अधिकारी अंमलदारांना प्रोत्साहन मिळावे आणि वेळोवेळी त्यांचे कौतुक व्हावे या दृष्टीकोणातून पोलीस महासंचालक कार्यालय बक्षीस देत असते. महाराष्ट्रात घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांची एकत्रित माहिती अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे जमा होत असते. त्याचा अभ्यास करून गुणात्मक अन्वेषण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करणारे अधिकारी व अंमलदार तसेच मालमत्ता हस्तगत करण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांना हे बक्षीस दिले जात असते. राज्यभरात 20 पोलीस अधिकारी आणि 61 पोलीस अंमलदारांना हे बक्षीस जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये कांही घटकांना 10 हजार तर काही घटकांना 15 हजार असे बक्षीस देण्यात आले आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना 7 हजार रुपये, सहाय्यक रमाकांत पांचाळ यांना 4 हजार रुपये, पोलीस अंमलदार गुंडेराव करले यांना 2 हजार रुपये आणि देविदास चव्हाण यांना 2 हजार रुपये असे एकूण 15 हजार रुपये बक्षीस देण्यात आले आहे. उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 27/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 457,380 नुसार दाखल झाला होता. यामध्ये चिखली येथील देवराव भिमराव कदम यांच्या घरातून 83 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यात 37 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे होते. इतर ऐवज वेगळा होता. स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणात सचिन उर्फ बोबड्या बाबूराव भोसले, मोठा मोहन बाबूराव भोसले दोघे रा.कुरूळा ता.कंधार आणि कैलास उर्फ अण्णासाहेब माधवराव शिंदे उर्फ शिंगाडे रा.सिरसाळा ता.परळी या तिघांना पकडून त्यांच्याकडून 31 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले होते. या कामासाठी चिखलीकर, पांचाळ, करले आणि चव्हाण यांना बक्षीस मिळाले आहे. स्थानिक गुन्हा शाखेत मागील 20 महिन्यापासून काम करतांना द्वारकादास चिखलीकर यांनी अनेक महत्वपुर्ण कामे केली. त्यात आज पोलीस महासंचालक कार्यालयाने अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या शिफारसीवरुन दिलेले हे बक्षीस त्यांच्यासाठी मानाचा एक तुरा आहे.
नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सन 2019 मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक मच्छींद्र तुकाराम सुरवसे हे सध्या पोलीस ठाणे गंगापूर औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी त्या ठिकाणी घडलेल्या एका खून प्रकरणातील आरोपींना गजाआड करून गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले म्हणून मच्छींद्र सुरवसे यांना 4 हजार रुपये, पोलीस उपनिरिक्षक अर्जुन वामन चौधरी यांना 3 हजार रुपये आणि पोलीस अंमलदार कैलास लक्ष्मणराव निंभोरकर आणि गणेश अशोक खंडागळे यांना प्रत्येकी 1500 रुपये बक्षीस देण्यात आले आहे. या यादीमध्ये मराठवाड्यातील लातूरचाही समावेश आहे. जेथे सहाय्यक पोलीस निरिक्षक तात्या भालेराव, राहुल बहुरे, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे आणि ईश्र्वर तुरे यांना सुध्दा या यादीमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.
पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा महासंचालक कार्यालयाने केला सन्मान