नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम बंगालमधील कोलकत्ता आणि बिहार राज्यातील पटणा येथे रेल्वे विभागातील बुकींग क्लर्क या पदावर नोकरी लावतो म्हणून कांही जणांनी 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार धर्माबाद पोलीसांनी गुन्ह्याच्या स्वरुपात दाखल केला आहे.
अरुण भगवानराव कुंडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जानेवारी 2019 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान कांही जणांनी त्यांना रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवून खोटे बनावट फॉर्म भरुन घेतले, बनावट मेडिकल पत्र बनवून ते खरे असल्याचे भासवून तक्रारदाराकडून नोकरीसाठी 8 लाख रुपये आणि बॅंक खात्यावर 3 लाख रुपये असे एकूण 11 लाख रुपये घेवून फसवणूक केली आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक सोहन माछरे अधिक तपास करीत आहेत.
सोहन माछरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, नोकरी पैसे देवून लागत नसते. असे कोणी सांगत असेल तर त्याबाबत पोलीस विभागाशी संपर्क साधून माहिती जाणून घ्यावी. त्यातील खरे-खोटेपणा समजून घ्यावा आणि त्यानंतरच पुढचा विचार करावा. जेणे करून कोणाची फसवणूक होणार नाही. एखाद्याच्या जीवनात आर्थिक अडचण आल्यानंतर त्याच्या जीवनात खुप मोठा प्रभाव पडतो याची जाणिव ठेवून जनतेने दक्षता घ्यावी असे सांगितले आहे.
रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून 11 लाखांची फसवणूक