नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 85 किलो चंदन 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे पकडले आहे. दोन चंदन चोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार संजय केंद्रे, पदमसिंह कांबळे, सुरेश घुगे, संजीव जिंकलवाड आणि अर्जुन शिंदे हे गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे पिंपळगाव (पुंड/डक) येथे गावाच्या उत्तरेत असलेल्या दत्तात्रय संस्थान मठाच्या जागेलगत गोदावरी नदी काठी सार्वजनिक जागेत असलेले चंदन कोणी तरी चोरून नेत आहे. त्या ठिकाणी धाव घेवून चंदन कापून घेणाऱ्या माधव पंढरी काळींबे (25) रा.जांब (बु) ता.मुखेड आणि जनार्धन सटवा जाधव (22) रा.इंदिरानगर लोहा या दोघांना पकडले. त्यांनी चंदनाच्या झाडाला तोडून त्यातून वेगवेगळे सहा खोड काढले होते. त्यांचे एकूण वजन 85 हजार रुपये आहे. बाजारात या चंदनाची किंमत 1 लाख 70 हजार रुपये आहे.
संजय केंद्रे यांच्या तक्रारीवरील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात माधव काळींबे आणि जनार्धन जाधव विरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 379, 34 आणि भारतीय वनअधिनियम 1927 च्या कलम 41 आणि 42 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार रामदिनवार हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 70 हजार रुपयांचे चंदन पकडले