या दरोड्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक सुध्दा आहे
नांदेड(प्रतिनिधी)-दि.31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.जयसिंग सोळंके यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठन लुटण्याच्या कारणावरून एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन जणांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून नांदेड ग्रामीणसह पोलीस ठाणे विमानतळ आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बळजबरीने ऐवज लुटल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरट्यांकडून तीन गुन्ह्यांमधील ऐवज आणि त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी असा 2 लाख 6 हजार 834 रुपयांचा ऐवज जप्त केल्याची प्रेसनोट तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी असलेले अत्यंत कर्तव्यकठोर पोलीस निरिक्षक श्री. अशोकरावजी घोरबांड यांनी जारी केली आहे.
29 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग रामसिंग सोळंके हे आपल्या पत्नीसोबत दुचाकीवर जात असतांना नागार्जुना हायस्कुलजवळच्या गतीरोधकावर गाडीचा वेग शुन्य झाला तेंव्हा त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे गंठन अज्ञात दरोडेखोरांनी बळजबरीने लंपास केले होते. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, ज्ञानोबा कौठेकर, शाम नागरगोजे, प्रभाकर मलदोडे, दिलीप चक्रधर, विश्र्वनाथ पवार, चंद्रकांत स्वामी, नामदेव मोरे, शिवानंद कानगुले, सुरेश पुरी, राजू हुमनाबादे या पथकाने कौठा येथील निलेश बालाजीराव बारसे आणि बालाप्रसाद अशोक ताटीपामुलवार रा.चौफाळा यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. डॉ.जयसिंग सोळंके यांच्या पत्नीचे गंठण 57 हजार 474 रुपयांचे तसेच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लुटलेले 48 हजार 925 रुपयांचे सोन्याचे गंठन आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोन्याचे मंगळसुत्र 48 हजार 435 रुपयांचे आणि दोन हजार रुपयांचा मोबाईल असे साहित्य या दरोडेखोरांकडून जप्त केले आहे. त्या तरोडेखोरांनी गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी गाडी सुध्दा नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केली आहे. या कामगिरीसाठी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.