नांदेड(प्रतिनिधी)-आरोपींनी केलेली कृती ही सार्वजनिक पैशांच्याविरोधात आहे. म्हणून त्यांना दया दाखवता येणार नाही. त्यांना दया दाखवली तर ते पुन्हा असे करतील. तसेच आपण एखादा गुन्हा केला तर कांही वर्षांनी सुध्दा आपल्याला तुरूंगात जावे लागते असा संदेश समाजात जावा अशी नोंद करून पाचवे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी एका फसवणूक प्रकरणात दोन जणांना पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच शिक्षा झालेल्या आरोपींनी 25 हजार रुपये नुकसान भरपाई एका महिन्यात फसवणूक केलेल्या कंपनीला द्यावी असे आदेश न्यायनिर्णयात दिले आहेत.
श्रीराम फायनान्स कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी सन 2011 मध्ये गुन्हा क्रमांक 79/2011 दाखल केला. त्यात भारतीय दंड संहितेची कलमे 420, 437,438, 471 आणि 34 जोडलेली होती. या प्रकरणात बालाजी गुणाजी खंदारे (32) रा.वडेपुरी ता.लोहा जि.नांदेड, दिपकसिंह खुशालसिंह ठाकूर (30) रा.लोहरगल्ली,नांदेड आणि गुरमितसिंघ अर्जुनसिंघ टमाना (46) रा.गुरूद्वारा गेट नंबर 5 जवळ नांदेड अशा तीन जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. पोलीसांनी या प्रकरणी तपास करून तिघांविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. त्यावर आरसीसी क्रमांक 48/2012 लिहिण्यात आला. हा खटला न्यायालयात 12 जानेवारी 2012 रोजी दाखल झाला होता. त्याचा निकाल 9 वर्ष 7 महिने आणि 19 दिवसांनी लागला.
या प्रकरणाची माहिती अशी आहे की, 20 नोव्हेंबर 2009 रोजी बालाजी कंधारे आणि दिपकसिंह ठाकूर कंपनीकडे गेले आणि एम.एच.26 एस.3018 ही चार चाकी गाडी गहाण ठेवण्याची विनंती केली. त्यासाठी श्रीराम फायनान्सने 1 लाख 80 हजार रुपये बालाजी कंधारेला कर्ज दिले.त्यावेळी 17.76 टक्के व्याजदर होता. या कर्जाचे जामीन दिपकसिंह ठाकूर यांनी घेतली होती. आरटीओ विभागात गाडीची नोंदणी करून त्यावर कंपनीचे नाव लावून ते पुस्तक कंपनीला देण्यात आले. हे 1 लाख 80 हजारांचे कर्ज 33 हप्त्यांमध्ये 7945 रुपये दरमहाप्रमाणे भरायचे होते. श्रीराम फायनान्सच्या अधिकाऱ्याने याबाबत तपासणी केली असता त्याला बऱ्याच बाबी अर्धवट दिसल्या म्हणून त्याने भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तपासणी केली तेंव्हा खळबळजनक माहिती दिसली. कंपनीने ज्या एम.एच.26 एस.3018 या चार चाकी गाडीवर कर्ज दिले होते. ती गाडी चक्क दुचाकी निघाली. आपण गाडीचे मालक नसतांना त्या गाडीची नोंदणी आपल्या नावाने केली आणि त्या गाडीचा विमापण काढला. ही तपासणी झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि हा खटला न्यायालयासमक्ष 9 वर्ष 7 महिने चालला. यामध्ये 8 साक्षीदार तपासण्यात आले आणि चार चाकी गाडीला दुचाकीचा क्रमांक देवून श्रीराम फायनान्सकडून कर्ज घेतल्याची बाब आरोपी बालाजी कंधारे आणि दिपकसिंह ठाकूर विरुध्द सिध्द झाली. या प्रकरणातील तिसरा आरोपी गुरमितसिंघ टमाना याविरुध्द दोष सिध्दी झाली आहे.
दोषसिध्दी झाल्यानंतर न्यायालयात शिक्षा देण्याअगोदर दया दाखविण्याची विनंती करण्यात आली. त्यात न्यायालयाने भरपूर कांही नमुद केले आहे. यामध्ये श्रीराम फायनान्सची रक्कम ही अर्थात जनतेची रक्कम आहे असे लिहिले. सोबतच अशा बनावट लोकांमुळे कंपनीचे भरपूर नुकसान होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामगारांवर होतो ज्यांचा उदरनिर्वाह कंपनीवर आहे. या सिध्द झालेल्या गुन्ह्यात दहा वर्षाची शिक्षा आहे. दयेचा विचार केला तर आरोपींना आपण केलेल्या गुन्ह्याची जाणव होणार नाही आणि यांना शिक्षा दिली तर समाजात हा पण संदेश जाईल की, गुन्हा केल्यानंतर सुध्दा कांही वर्षात आपल्याला शिक्षेला सामोरे जावे लागते. म्हणजे कायद्याची भिती समाजावर राहिल अशी नोंद आपल्या निकालपत्रात करून न्यायाधीश एम.बी.कुलकर्णी यांनी याप्रकरणातील गुरमितसिंघ टमानाला मुक्त केले. आरोपी बालाजी गुणाजी कंधारे आणि दिपकसिंह खुशालसिंह ठाकूर या दोघांना भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 437, 438, 471 आणि 34 नुसार दोषी मानले. त्यात 420 आणि 468 कलमासाठी दोघांना तिन वर्ष सक्तमजुरी, कलम 467 साठी 5 वर्ष सक्तमजुरी आणि कलम 471 साठी 1 वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. सोबतच दिपकसिंह ठाकूर आणि गुणाजी कंधारे या दोघांनी श्रीराम फायनान्स या कंपनीला 25 हजार रुपये प्रत्येकाने एका महिन्यात नुकसान भरपाई म्हणून द्यावे असेही आदेश दिले आहेत. दिलेल्या सगळ्या वेगवेगळ्या शिक्षा दोघांना एकत्रितपणे भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.व्ही.बी.तोटवाड यांनी मांडली.तर आरोपी असलेले बालाजी कंधारे, दिपकसिंह ठाकूर यांच्यावतीने ऍड. पी.आर.अग्रवाल यांनी काम केले. तर आरोपी गुरमितसिंघकडून ऍड. के.एस.पुजारी यांनी बाजु मांडली.
दुचाकी गाडीला चार चाकी दाखवून कर्ज घेणाऱ्या दोघांना 5 वर्ष सक्तमजुरी