नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला लुटतांना पोलीसांनी प्रत्यक्ष पाहिले आणि घटनास्थळी विद्युतवेगाने पोहचले. एका दरोडेखोराला पोलीसांनी पकडले पण एक पळून गेला. पळून जाणार्या हातात कत्ती होती. तरीपण पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अर्ध्यातासात जेरबंद केले. गुन्हा घडला आणि आरोपी पकडला. या सर्व प्रक्रियेला फक्त दीड तासाचा अवधी लागला.

आज दि.६ सप्टेंबर रोजी लिंबगाव पोलीस आपल्या हद्दीत गस्त करत असतांना नवीन हस्सापूर येथील पश्चिम वळण रस्त्यावर एका दुचाकीस्वाराला दोन जण लुटत होते. ही घटना पाहताच पोलीस विद्युतवेगाने तेथे पोहचले. पोलीसांनी एकाला जेरबंद केले. पण दुसरा आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६ बी.यु.९४४६ सोडून पळाला. त्याच्या हातात कत्तीपण होती. पळतांना पडल्यामुळे त्याला दुखापत झाली. ज्या व्यक्तीकडून लुट करण्यात आली. त्याच्या एक मोबाईल १५ हजार रुपये किंमतीचा लुटला होता.
लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार मुंजाजी चवरे, उत्तम देवकत्ते, गजानन खंडागळे, रमेश चव्हाण, विजय तोडसांब, जगनन्नाथ केंद्रे, सोमनाथ स्वामी, गृहरक्षक दलाचे मारोती कानडे यांनी पळालेल्या दरोडेखोराला भोईवाडा हस्सापूर येथे पकडले. पकडलेल्या दरोडेखोरांची नावे शेख अकबर शेख गौस (२२) रा.खडकपुरा नांदेड आणि शेख अफरोज शेख अफसर (२९) रा.नवीन हस्सापूर अशी आहेत. पोलीस अंमलदार शुध्दोधन वाघमारे यांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक अमृत केंद्रे हे करीत आहेत. पोलीसांनी या दरोडेखोरांना जनतेसमोर आपले अस्तित्व दिसावे, पोलीस कसा असतो हे जनतेने पाहावे असे करुन या दोघांना अटक केली. लिंबगाव पोलीसांनी अत्यंत विद्युत वेगाने केलेल्या या कार्यवाहीचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब देशमुख यांनी कौतुक केले आहे.