नांदेड(प्रतिनिधी)-माहिती अधिकार संरक्षण समिती या नावाची कोणतीच संस्था सार्वजनिक न्यास नोंदणी विभागात नोंद नसल्याची माहिती कार्यालयाच्या अधिक्षकांनी दिल्यानंतर या माहिती अधिकार संरक्षण समितीच्या लेटर पॅडवर असलेल्या नंबरप्रमाणे ही माहिती मागितल्यानंतर ही सत्यता समोर आली. मुळात नोंदणी क्रमांकाप्रमाणे या समितीचे नाव जनहित माहिती सेवा समिती असे आहे. या समितीच्या उद्देशांचे वाचन केले तर डोके गरगर फिरल्याशिवाय राहत नाही. या उद्देशांमधून फक्त राज्यभर माहिती अधिकार संरक्षण समितीची पदे वाटण्याचे काम फक्त करण्यात आले आहे.
शेख जाकीर शेख सगीर या व्यक्तीने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अर्धापूर येथे 420 क्रमांकानुसार एक अर्ज चौकशी दाखल केली. त्यात संस्था स्थापनेचा विषय आहे. या संस्थेचे नाव जनहित माहिती सेवा समिती असे आहे. पण कामकाज सर्व माहिती अधिकार संरक्षण समिती या नावाने चालते. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात जनहित माहिती सेवा समितीचा नोंदणी क्रमांक एफ-0023330/एनएनडी/एमएच असा आहे.
जनहित माहिती सेवा समितीचे उद्देश माहिती अधिकार कायद्याची जनसामान्यामध्ये प्रचार व प्रसार करून जनजागृती करणे. (अशी जनजागृती केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही नेहमीच करतात) माहिती अधिकार कायद्याची जागोजागी शिबिरे घेणे. (असे शिबिर कोठेच घेण्यात आलेले आम्हाला दिसले नाही.) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विविध विकास कामांच्या माहिती मागवून पारदर्शकता आणण्याचे काम करावे ही जनजागृती करणे (माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती बरीच मागवली जाते पण त्यात पारदर्शकता कोठे दिसली नाही).भ्रष्टाचार निर्मुलन होण्यासाठी शिबिरे घेणे (असे शिबिर घेतल्याचे आम्हाला दिसले नाही) सर्व प्रकारच्या राज्यभर होणाऱ्या भ्रष्टाचार हे जनजागृती करून थांबविण्यासाठी प्रयत्न करणे (असा प्रयत्न सुरू असतो). माहिती अधिकार
अधीनियमचा वापर कसा करावा हे राज्यभर प्रत्येक ठिकाणी गावो-गावी पदांची नियुक्ती करणे समिती स्थापन करणे (अनेक लोकांना जनहित माहिती सेवा समिती ऐवजी माहिती अधिकार संरक्षण समितीची पदे वाटण्यात आली).
या शिवाय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वस्तीगृह चालविणे, बालगृह चालविणे प्रशिक्षण केंद्र चालविणे असा उद्देश या समितीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये लिहिलेला आहे. सोबतच धर्मदाय आयुर्वेदिक, होमियोपॅथीक, युनानी, दवाखाने, फिरते दवाखाने, मल्टी स्पेशालिटी दवाखाने चालविणे. कुटूंब कल्याण केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे, एड्स निर्मुल केंद्र, निसर्गोपचार केंद्र चालविणे, माता बालसंगोपन केंद्र , केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना बाबत सामाजिक प्रबोधन मेळावे घेणे युनीसेफच्या आरोग्य विषयी योजना राबविणे, समाजकल्याण विभागाच्या धर्मदाय स्वरुपाच्या योजना राबविणे, शालेय साहित्य वाटप करणे. वृध्दाश्रम, अनाथाश्रम, बालसदन चालविणे. दारु बंदी कार्यक्रम, हुंडा प्रथा निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन, नशाबंदी आदी कार्यक्रम करणे. श्रमदान व लोकसहभागातून आदर्श ग्राम रचना, ग्राम स्वच्छता मोहिम, आदर्श गाव योजना राबविणे असे उद्देश लिहिलेले आहेत.
संस्थेच्या उद्दीष्टाप्रमाणे खर्चाची तरतुद लिहिलेली आहे. पण सार्वजनिक न्यास नोंदणी विभागाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये हिशोब झाला असा उल्लेखच नाही. या संस्थेची स्थापना होवून तीन वर्ष झाले आहेत. तरी संस्थेचा हिशोब सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने सुध्दा विचारलेला दिसत नाही. अशा प्रकारे जनहित माहिती सेवा समिती आणि नोंदणी नसलेली माहिती अधिकार संरक्षण समिती भव्य उद्देशाने कार्यरत आहे. याचा हिशोब कोण आणि कधी घेईल हे मात्र कांहीच कळले नाही. सोबतच मोठ-मोठे अधिकार प्राप्त अधिकारी यांनी सुध्दा या दोन संस्थामधील फरक आणि त्याचा हिशोब विचारण्याची हिंमत दाखवलेली नाही. उलट अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना व्हॉटसऍप संदेश पाठवून ते संदेश कनिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवून आपल्या संस्थेच्या उद्देशांना अत्यंत उत्कृष्टपणे पुर्ण करणारी ही संस्था प्रशंसनियच आहे. आपल्याला शासनाने दिलेला पोलीस सुरक्षा रक्षक मात्र कायम राखण्यात यश आले आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातील ‘काही सूर्यजी पिसाळ’ त्यांच्या मदतीला आहेतच. म्हणून तर सर्व काही आलबेल सुरु आहे.
शेख जाकीरची जनहित माहिती सेवा समिती आपल्या उद्दीष्टांप्रमाणेच कार्य करते ?