आपले कार्यक्षेत्र नसतांना नांदेड शहरातील पोलीस निरिक्षक मारहाणीत का सहभागी झाला ?
नांदेड(प्रतिनिधी)-दि.2 सप्टेंबर रोजी सुर्यप्रकाशाचा भरपूर उजेडात कांही पोलीसांनी गऊळ ता.कंधार येथे मातंग समाजातील प्रत्येकाला मारहाण करून दाखवलेली हुकूमशाही निंदनीयच आहे. या प्रकारात ज्या पोलीस अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र गऊळ हे गाव नाहीच त्याने केलेला अन्याय सर्वात महत्वपूर्ण आहे. कोणाच्या आदेशाने तो पोलीस अधिकारी तेथे गेला होता. याचा शोध होणे महत्वपूर्ण आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्याकडे आहे. त्याचा निर्णय यायला वेळ लागेल. पण त्यांनी कोणाला पाठीशी घालण्याऐवजी सत्य तोच अहवाल तयार करावा ज्यामुळे पोलीसांची प्रतिमा समाजापुढे उंच होणार आहे.

गऊळ ता.कंधार हे गाव कंधारपासून आठ ते दहा किलो मिटर अंतरावर असलेले आहे. या गावची एकूण लोकसंख्या 1 हजार ते 1500 ऐवढी असेल. दि.2 सप्टेंबर रोजी या गावात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा बसविलेला पुतळा प्रशासनाने मोठी पोलीस फौज घेवून काढला. विशेष म्हणजे गऊळ या गावच्या नमुना नंबर 8 मध्ये मालमत्ता क्रमांक 236 वर 75 फुट लांब आणि 50 फुट रुंद अशी जागा उल्लेखीत आहे. या जागेच्या मालकाचे नाव रकान्यात अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची नियोजित जागा असे लिहिलेले आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ 3 हजार 750 चौरस फुट लिहिलेले आहे. या बाबत ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायत गऊळ ता.कंधार जि.नांदेड यांनी 28 ऑगस्ट 2021 रोजी सत्यप्रत करून दिलेला गाव नमुना क्रमांक 8 हा अभिलेख प्राप्त झाला. या अभिलेखात ही सर्व माहिती लिहिलेली आहे.
गाव नमुना क्रमांक 8 कोणीही खाजगी व्यक्ती बनवू शकत नाही. ग्रामपंचायत गऊळचे पदाधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी यांनी हा अभिलेख आजपर्यंत पाहिला नसेल असेही म्हणता येणार नाही. गऊळ येथे राहणाऱ्या मातंग समाजातील बांधवांनी आपल्या बापाच्या नावे असलेल्या जमीनीवर आपल्या बापाचा पुतळा बसविला तर त्यात चुकीचे काय आहे. या नियोजित जागेची चुतर्थ सिमा पाहिली असता पुर्वेस मंदिर आहे. पश्चिम, दक्षीण आणि उत्तर या तीन दिशांना रस्ता आहे. मंदिराच्या पाठीमागे ही मोकळी जागा आहे. गऊळ येथील मातंग समाजाच्या बांधवांनी आपले श्रध्दास्थान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला तेंव्हा ही जागा त्यांचीच आहे हे प्रशासनानाला माहित नव्हते काय? आणि माहित असतांना तो पुतळा काढण्याची गरज काय होती. म्हणजे उगीचच आगीत तेल टाकण्याचा प्रकार घडला आहे. या आगीत तेल कोणी टाकले हे शोधणे महत्वाचे आहे. नाही तर अशीच आग समाजात पुढे लागत राहिल आणि असेच प्रकार नेहमी घडत राहतील.
दि.2 सप्टेंबर रोजी मोठा पोलीस फाटा गऊळ गावात पोहचला. त्यावेळी त्या ताफ्याचे प्रमुख अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे हे होते. त्यांच्यासोबत नांदेड शहरात कार्यरत एक पोलीस निरिक्षक साहेब पण गेले होते. त्यांना तेथे जाण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला ? हा प्रश्न सुध्दा मोठा आहे. त्यांनी केलेली मारहाण तर याही पेक्षा पुढची बाब आहे. महिला, वयस्कर, तरुण, बालक कोणीच सुटला नाही ज्याला या साहेबांनी मारहाण केलेली नाही. या साहेबांच्या तेथे रवानगीचा कांही अभिलेख घेण्यात आला काय? कंधार ते नांदेडमध्ये कंधार, लोहा, सोनखेड, हे पोलीस ठाणे पण आहेत. मग नांदेड शहरात कार्यरत अधिकारी त्या ठिकाणी का गेला? याचा शोध चौकशीत होणे आवश्यक आहे.
या संदर्भाने पोलीस अधिक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. या बैठकीत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी या मारहाण प्रकरणाची चौकशी विजय कबाडे यांच्याकडे देण्याचा निर्णय जाहीर केला तेंव्हा त्यांची तारीफ करत अनेक कार्यकर्त्यांनी यांना आम्ही चांगलेच ओळखतो कारण त्यांनी नांदेड येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून काम केलेले आहे असे सांगितले होते. यानंतर गऊळ गावातून कोणी-कोणाला फोन केले याचा अभिलेख तपासण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली होती. यावरून कोठे तर विरजण पडलेले आहे. हे नक्कीच आहे.
सध्या मारहाणीची चौकशी देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्याकडे आहे. नवोदित अधिकारी असल्याने आपल्याच अधिकाऱ्यांच्याविरुध्द ते काय करतील हा प्रश्न असला तरी पोलीसांसमक्ष आलेल्या अभिलेखावरून सत्य अहवाल लिहावा अशी अपेक्षा मातंग बांधवांना आहे.