नांदेड(प्रतिनिधी)- एका वर्षापूवीच लग्न झालेल्या एका विवाहितेवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करण्यात आला. हा प्रकार मडरगा ता. हदगाव येथे दि. 11 सप्टेंबर रोजी घडला. हदगाव पोलिसांनी मारेकरी पती आणि दीर या दोघांना ताब्यात घेतले आहे.
रामदास बबनराव अवचार रा. भोसी ता. कळमनुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या बहिणीची मुलगी सगुना उर्फ गायत्री हिचे पालन पोषण त्यांनीच केले. कारण बहिणीचा मृत्यू झाला होता. एक वर्षापुर्वी 4 ऑगस्ट रोजी सगुना उर्फ गायत्रीची लग्न मडरगा येथील संजय दत्तराव काळे सोबत झाले. या लग्नाअगोदर संजयचे पहिले पण लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सगुनासोबत काही महिने संसार चांगला चालला, पण नंतर सगुनाच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येऊ लागले. तसेच तिला मामाकडून पैसे आणण्यासाठी सांगण्यात येत होते. हा नेहमीचा प्रकार अनेक लोकांच्या मदतीने समजूत काढून, चांगले वागण्याची समज देऊन पुढे चालू होता. दि. 11 सप्टेंबर रोजी रामदास अवचार यांना सगुना चक्कर येऊन पडल्याचे संदर्भाने फोन आला. त्यांनी जाऊन तपासणी केली असता सगुनाच्या डोक्याला जबर मार होता आणि तिच्या डोळयाजवळ पण जखमा होत्या. सगुनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा नवरा संजय दत्तराव काळे, सासरा दत्तराव, सासू कौशल्या, दीर राजू आणि जाऊ गोदावरी यांनी माझ्या भाचीचा खून केल्याची तक्रार दिल्यानंतर हदगाव पोलिसांनी गुन्हा क्र. 250/2021 कलम 302, 498, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कोलाने यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. हदगाव पोलिसांनी नवरा संजय दत्तराव काळे आणि दीर राजू दत्तराव काळे या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा खून; नवरा आणि दीर पोलिसांच्या ताब्यात