13 आणि 14 सप्टेंबर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

नांदेड (प्रतिनिधी)- प्रादेशिक  हवामान केंद्र मुंबई यांनी आज 12 सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार 13 आणि 14 सप्टेंबर हे दोन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जनतेने सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकरीता असे स्वाक्षरी करून करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी जारी केलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात 13 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहतील, वीजेच्या कडकडाटांसह आणि ढगांच्या गडगडांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी असाच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत जनतेने काय करावे यासंदर्भाने प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. या प्रेसनोटवर जिल्हाधिकारी नांदेडकरीता असे लिहून त्यावर स्वाक्षरी आहे. मुळात करीता हे शब्द लिहून स्वाक्षरी करताना स्वाक्षरी करणाऱ्याने आपले नाव, पद सुद्धा लिहिणे आवश्यक आहे. जनतेने आकाशात विजा चमकत असताना घराच्या बाहेर, बालकणीत, गच्चीवर, बाहेर थांबू नये. तारांचे कुंपण, विजेचा खांब आणि इतर लोखंडी वस्तू यांच्यापासून दूर रहावे. आकाशात विजा चमकत असताना घरातील लॅन्डलाईन फोनचा वापर करू नये, शावरखाली अंघोळ करू नये, घरातील बेसींग नळ, पाईपलाईन आदींना स्पर्श करू नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. पूर प्रवाहात प्रवेश करू नये. पूर येण्यापुर्वी हवामानाच्या बदलातील अद्यावत माहिती घेत रहावे. जीवनासाठी आवश्यक वस्तूंचे कीट तयार ठेवावे. पूर आला तर उकळलेल्या क्लोरीनयुक्त पाणी प्यावे, मुलांना पूराच्या पाण्यात खेळू देऊ नये, पूर ओसरून गेल्यावर कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका. पूरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. प्रत्येक वस्तू निर्रजंतुक करा आणि सुरक्षीत रहा. प्रशासन आपल्या सुविधेसाठी तत्पर आहे त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा असे या प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *