नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहिपिंपळगाव फाट्याजवळ एका माणसाला रोखून खंजीरच्या धाकावर त्याची दुचाकी गाडी आणि एक मोबाईल बळजबरीने चोरणाऱ्या पाच दरोडेखोरांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याकडून 3 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
4 मे रोजी रोहिपिंपळगाव फाटा कामळज शिवार येथे एका माणसाला रोखून खंजीरचा धाक दाखवत त्याच्याकडील दुचाकी गाडी आणि मोबाईल कांही दरोडेखोरांनी बळजबरीने चोरून नेला होता. या बाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 83/2021 दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार पिंपळगाव फाटा येथे दरोडा टाकणारे दरोडेखोर वाजेगाव परिसरात आहेत. त्यानुसार आज दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहू, मारोती तेलंग, मोतीराम पवार, तानाजी येळगे, विठ्ठल शेळके, गजानन बैनवाड, शेख कलीम यांनी वाजेगाव परिसरातून भगवान दिगंबर भद्रे (22), शेख ईसमाईल शेख बशीर (19), सिध्दार्थ ग्यानोजी भोकरे (36) सर्व रा.वाजेगाव, बुध्दभूषण राजेंद्र तारू (22) रा.पुयडीवाडी ता.नांदेड आणि शेख बाशू शेख शफी (28) रा.वाजेगाव या 5 जणांना पकडले. त्यांच्याकडून 4 मे रोजी चोरलेल्या मोटारसायकलीसह इतर दोन अशा तीन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या पाच चोरट्यांनी तीन दुचाकी गाड्यांसह स्थानिक गुन्हा शाखेने मुदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी दिले आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.