नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील तोंडी आदेशावर कार्यरत फौजदार डॉ.परमेश्र्वर चव्हाण यांनी एक चोरीची दुचाकी गाडी पकडली आहे. ही गाडी तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून आणली होती.
नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहेत. त्या अनुरूप पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी या घटनांवर वचक आणण्यासाठीची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली. त्यानंतर आपल्या विभागातील अत्यंत कर्मट फौजदार डॉ.परमेश्र्वर चव्हाण यांच्यावर द्वारकादास चिखलीकर यांनी ही जबाबदारी सोपवली. द्वारकादास चिखलीकर यांचा विश्र्वास सार्थ ठरवत फौजदार डॉ.परमेश्र्वर ठानुसिंग चव्हाण, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, पद्मसिंह कांबळे, रुपेश दासरवाड, बालाजी यादगिरवाड, हेमंत बिचकेवार अशा मेहनती लोकांसोबत 18 सप्टेंबर रोजी फौजदार गस्त करत असतांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीच्या पुलावर दोन संशयीत व्यक्ती दिसले. त्यांची तपासणी केली तेंव्हा त्यांच्याकडे एम.एच.26 ए.क्यु.2966 क्रमांकाची दुचाकी गाडी होती. या गाडीबद्दल विचारणा केली असता ते दोन युवक त्याचे उत्तर देवू शकले नाहीत. ते दोन जण संभाजी परवता पवार रा.आमदुरा ता.मुदखेड आणि सुनिल विनायक पुयड रा.पुणेगाव ता.मुदखेड असे होते. या दोघांकडे असलेल्या मोटारसायकलची तपासणी केली असता ती दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.3574 अशा मुळ क्रमांकाची होती. याबाबत तपासणी केली असता ती गाडी तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरुन आणलेली होती. त्याबाबत तामसा येथे गुन्हा क्रमांक 134/2021 दाखल आहे. पकडलेली चोरीची दुचाकी आणि दोन चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने तामसा पोलीसांच्या स्वाधीन केली आहेत.