सोनखेड पोलीसांनी यात दखल देवून हा प्रकार तहसीलदार लोहाकडे पाठविला
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-लोहा रस्त्यावर एका धाब्याजवळ एका स्कॉर्पीओ गाडीने एका ट्रकला थांबवून त्याची तपासणी केल्याची माहिती सोनखेड पोलीसांना मिळाल्यानंतर सोनखेड पोलीसांनी तो ट्रक ताब्यात घेतला आहे. स्कॉर्पीओमधील मंडळी ही भारतीय जनता पार्टीशी संबंधीत सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत. सोनखेड पोलीसांनी याबाबत तहसीलदार लोहा यांना पत्र पाठविले आहे. अशा संघटनांना किंवा पक्षांना कोणत्या ट्रक थांबवण्याचा आणि विचारणा करण्याचा अधिकार आहे काय हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. शासनाने हा ट्रक तपासणीचा अधिकार जनतेलाच देवून टाकावा म्हणजे पोलीस आणि महसुल विभाग यांच्यावरील कामाचा ताण कमी होईल.
काल सायंकाळी 5 ते 6 या वेळेत सोनखेड येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर हे आपल्या सहकाऱ्यांसह लोहा सोनखेड रस्त्यावर त्यांना मिळालेल्या माहिती अनुसार स्कॉर्पीओ गाडीला शोधत निघाले. त्या ठिकाणी स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच.26 ए.के.3278 उभी होती. या गाडीच्या मागच्या काचावर राणा असे शब्द लिहिलेल आहेत. सोबतच एम.एच.26 ए.डी.1339 हा ट्रक पण उभा होता. ट्रकमध्ये कोणीच नव्हते. तेंव्हा मांजरमकर यांनी स्कॉर्पीओ गाडीतील लोकांना विचारणा केली असता त्यांनी आपली नावे नरेंद्रसिंह हनुमानसिंह बैस(55), गुंतवणूक सल्लागार, जिल्हाउपाध्यक्ष भटके मुक्त जाती जमाती रा.सिडको, दुर्गासिंह रघुनाथसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष भविजा भाजपा नांदेड आणि दिपकसिंह विठ्ठलसिंह गौर, उपाध्यक्ष भविजा भाजपा नांदेड अशी होती. या गाडीच्या नंबरवरून आरटीओ ऍपवर माहिती घेतली असता या गाडीच्या मालकाचे नाव कपील करवंदे असे दाखवत आहे.
या बाबत महादेव मांजरमकर यांच्याकडे विचारणा केली असता स्कॉर्पीओ गाडीतील लोकांनी ट्रकला थांबवून त्याच्या पावत्या विचारल्या होत्या. या माहिती आधारावरच आम्ही तेथे गेलो होतो. तेथे गेल्यावर त्या गाडीत तांदूळ आहे. याबाबत तहसीलदार लोहा यांना स्कॉर्पीओ गाडीतील माणसांनी ट्रकला पकडून त्यांच्या पक्षाच्या वरीष्ठ लोकांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ महसुल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कळविले. अशा संदर्भाचे पत्र आम्ही तहसील कार्यालयाला देणार असून यावरील पुढील कार्यवाही तहसील कार्यालय करणार असल्याचे सांगितले. स्कॉर्पीओ गाडीतील लोकांना हा अधिकार आहे काय? असे विचारले असता महादेव मांजरमकर म्हणाले या ट्रकचा मालक किंवा चालक काय सांगतील यानंतर पुढील निर्णय होणार आहे.
अशा पध्दतीने खाजगी लोकांना ट्रक तपासणीचा अधिकार देवून टाकला तर जास्त छान होईल असा विचार पुढे आला आहे. ज्यामुळे पोलीस आणि महसुल प्रशासन यांच्यावर असलेल्या कामाचा बोजा कमी होईल. मागे कांही दिवसांपुर्वी नांदेड अर्धापूर रस्त्यावर सुध्दा असाच एका गाडीने ट्रकला रोखल्याचा प्रकार घडला होता. त्यात अगोदर पोलीस आणि नंतर खाजगी गाडी अशा स्वरुपाचा प्रकार घडला. पोलीस कोणते आणि खाजगी गाडी कोणती या संदर्भाने कोणी खुलासा केला नाही. घडलेल्या प्रकाराला अनेक जण दुजोरा देतात पण ठामपणे कोणी सांगत नाही. अर्धापूर रस्त्यात असाच एक बनावट राजा हरिश्चंद्र कार्यरत आहे. त्यानेच हा प्रकार घडविला होता आणि तो प्रकार घडल्यावर आपल्याला मिळालेल्या मलिद्यातील कांही हिस्सा पोलीसांनापण दिला होता अशी चर्चा ऐकायला मिळाली.