नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात एका 21 वर्षीय चोरट्याला पकडून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
वजिराबाद पोलीसांच्या गुन्हे शोध पथकात नव्याने कार्यरत झालेले धडाकेबाज फौजदार उत्तम वरपडे पाटील यांनी आपले सहाय्यक पोलीस अंमलदार दत्तराम जाधव अजय यादव, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, चंद्रकांत बिरादार, शेख इमरान, व्यंकट गंगुलवार आणि बालाजी कदम यांच्यासोबत 21 सप्टेंबर रोजी हिंगोली गेट परिसरात नाका बंदी करतांना वाहनाची तपासणी करीत होते. तेंव्हा एक बिना क्रमांकाची बुलेट दुचाकी गाडी सापडली. त्याची तपासणी केली असता ही गाडी विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 313/2020 मध्ये चोरी गेलेली गाडी आहे असे स्पष्ट झाले. सोबतच एक स्पेंडर मोटारसायकल स्वारास थांबण्याचा इशारा केला असता तो आपली दुचाकी जागीच सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. चोरी बुलेट गाडी आयोध्यानगर ,पावडेवाडी नाका येथील गोविंद माधव कासटेवाड यांची असल्याचे कळले. त्यानुसार ही बुलेट गाडी आणि बुलेट चोर शेख मोईन शेख रबानी (21) रा.मस्तानपुरा नांदेड विमानतळ पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गायकवाड हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी चोरीच्या दोन दुचाकी गाड्या पकडणाऱ्या वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि गुन्हे शोध पथकाचे प्रमुख उत्तम वरपडे पाटील आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांचे कौतुक केले आहे.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाने बुलेट चोर पकडला; दुसरी एक दुचाकी चोरटा सोडून पळून गेला