नांदेडच्या व्यक्तीने 13 लाख 80 हजार रुपये गुंतवले; देशात 100 कोटीची ही फसवणूक?
नांदेड(प्रतिनिधी)-20 आठवड्यात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यात इतवारा पोलीसांनी चंद्रपूर येथून एका आरोपीला पकडून आणल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी त्यास 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
20 सप्टेंबर रोजी शेख कलीमोद्दीन शेख साबीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा एक मित्र प्रकाश तामसेकर याने सप्टेेंबर 2020 मध्ये तयांना सांगितले की, एक नवीन गुंतवणूक कंपनी आहे. ज्यामध्ये गुंतवलेले पैसे 20 आठवड्यात दुप्पट करून मिळतात. यावर विश्र्वास ठेवून शेख कलीमोद्दीनची ओळख अफाट परतावा देणाऱ्या ट्रेडवीन मल्टीसर्व्हिसेस प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मुजिब कुरेशी हे नांदेडला आले असतांना झाली. त्यावेळी ट्रेडविन कंपनीचे संचालक नागमनी यादव आणि शेख साखरे यांच्यासोबत फोनवर बोलणे करून दिले. त्यानंतर शेख कलीमोद्दीन यांनी त्या कंपनीमध्ये संचालकांनी सांगितलेल्या बॅंक खात्यावर 13 लाख 80 हजार रुपये जमा केले. या सर्व खात्यांपैकी जास्तीचे खाते चंद्रपूर येथील बॅंकेत आहेत. 20 आठवड्यानंतर पैसे परत मिळाले नाही. तेंव्हा कलीमोद्दीन यांनी तगादा लावला. तेंव्हा चंद्रपूर बॅंकेचा एक 20 लाख रुपयांचा धनादेश शेख कलीमोद्दीन यांना देण्यात आला आहे. त्यांनी तो धनादेश आपल्या नांदेडच्या बॅंकेत वठविण्यासाठी टाकला असतांना दुसऱ्या दिवशी त्या धनादेशाला स्टॉफ पेमेंट असे पत्र देण्यात आले. यानंतर कलीमोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 232/2021 दाखल केला. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आणि पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांना देण्यात आला.
शेख असद, पोलीस अंमलदार राज घुले, धिरज कोमुलवार आणि महिला पोलीस अंमलदार कानुरे यांनी चंद्रपूरला जावून बरीच मेहनत केल्यानंतर या ट्रेडवीन मल्टीसर्व्हीसेसचा सीईओ मुजीबुर कुरेशी यास पकडले. नांदेडला आणल्यानंतर पोलीसांनी न्यायालयात सादर केलेल्या घटना क्रमाप्रमाणे ट्रेडविन कंपनीचे देशभरात 2 लाख 21 हजार सदस्य आहेत. या कंपनीचे सदस्य होण्यासाठीची फिस 2100 रुपये आहे. त्या मानाने विचार केला तर या कंपनीने देशभरात जवळपास 100 कोटी रुपयांना लोकांना गंडविल्याचे दिसते. या कंपनीतील इतर संचालक नागमनी यादव, पटना बिहार, शेख साखरे, मनोज कमाले रा.चंद्रपूर, तसेच राहुल माने रा.नांदेड आणि राजन शर्मा रा.नागपूर यांना पकडणे शिल्लक आहे. पकडलेल्या आरोपी मुजीबुर कुरेशी यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.