नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस असल्याची बतावणी करून अनेक लोकांची लुबाडणूक झाली. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदारांनी श्रीनगर भागात एका तोतय्या पोलीसाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सक्षम नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गोविंद मुंढे, जसवंतसिंघ शाहु, मारोती तेलंग, रुपेश दासरवाड, विठ्ठल शेळके, तानाजी येळगे, मोतीराम पवार, शेख कलीम, राजबंसी, गणेश धुमाळ हे दुपारी गस्त करत असतांना त्यांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर भागात एक तोतया पोलीस उभा आहे. त्यानंतर पोलीस पथक त्याच्याकडे पोहचले आणि त्या ठिकाणी पोलीसाचा गणवेश घालून उभा असलेला अंदाजे २४ वर्षाचा युवक ताब्यात घेतला. त्याचे नाव विलास संतुका ईबीतदार रा.खतगाव ता.बिलोली जि.नांदेड असे आहे. त्याने पोलीस शिपाई पदाचा सरकारी गणवेश धारण केला होता. खांद्यावर म.पो.लिहिले स्टीलचे प्लेट आहेत. त्याने लाईन यार्ड धारण केले होते. शर्टच्या खिशावर विलास संतुका ईबीतदार नावाचा नेमप्लेट लावलेला होता. त्याच्या जवळ निळ्या रंगाची महाराष्ट्र पोलीसांची पी कॅप होती. कंबरेवर चामडी बेल्ट, त्यावर स्टिलचे बक्कल लावलेले होते. त्याने काळ्या रंगाचे बुट परिधान केले होते. सोबतच आपल्या कंबरेला नक्कली एअर गन लावलेली होती आणि त्याच्याजवळ एक ऍनरॉईड मोबाईलपण होता.
पोलीस पथकाने विलास ईबितदारसह अग्नीशस्त्र व ईतर साहित्याचा पंचनामा करून त्याला भाग्यनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पांडूरंग दिगंबर भारती यांनी लिहिलेल्या तक्रारीत भारतीय दंड संहितेच्या कलम १७०, १७१ आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ६/२८ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १४९(अ) प्रमाणे कार्यवाही व्हावी असे लिहिले आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बर्याच दिवसापासून नागरीकांची तोतय्या पोलीसांनाकडून होणारी लुट एका तोतय्या पोलीसाला पकडून त्या मार्गावर मार्गक्रमण करून तोतया पोलिसांना पकडणऱ्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.