नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मुगाव ता.नायगाव येथील ग्राम पंचायत सरपंचांच्या कुटूंबातील व्यक्तींनी शासकीय सार्वजनिक जागेवर अतिक्रम केले आहे. ते अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे यांना दिले आहेत.
गट विकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांनी जावक क्रमांक 1960/2021 दि.29 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार त्यांनी हे पत्र विस्तार अधिकारी पंचायत एस.आर.कांबळे यांना उल्लेखीत करून लिहिले आहे. ज्यामध्ये मौजे मुगाव ता.नायगाव येथील सरपंचांच्या कुटूंबातील प्रमुख व्यक्तींनी सार्वजनिक शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. व सरपंच पती ग्राम पंचायतच्या खुर्चीवर बसून कारभार हाकत असल्यामुळे त्यांची त्वरीत चौकशी करून सरपंच पद व सदस्यत्व पद रद्द करावे आणि नियम बाह्य सरपंच प्रतिनिधीस सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करावी असा या पत्राचा विषय आहे. या पत्राला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद नांदेड यांच्या 31 ऑगस्ट 2021 च्या पत्राचा संदर्भ दिला आहे.
जिल्हा परिषद सर्कल मौजे मुगाव ता.नायगाव हे आपल्या अधिनस्त आहे. या ग्राम पंचायतीमधील सरपंचांच्या कुटूंबियांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केलेले आहे. सरपंच पती ग्राम पंचायतच्या खुर्चीवर बसून कारभार हाकतात. त्याची चौकशी करून त्यांचे सरपंच पद व सदस्यत्व पद रद्द करावे. सोबतच नियमबाह्य सरपंच प्रतिनिधीस सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याचा अर्ज प्राप्त झाला आहे. या सर्व प्रकरणाची नियमानुसार तात्काळ चौकशी करून ग्राम पंचायत कार्यालयास कळवावे आणि विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या पत्राची एक प्रत ग्रामसेवक ग्राम पंचायत मुगाव यांना देण्यात आली आहे. विस्तार अधिकारी पंचायत यांना चौकशीसाठी आवश्यक अभिलेखे उपलब्ध करून देण्यात यावे असेही लिहिले आहे.
मुगाव ता.नायगाव येथे सरपंच कुटूंबियांनी केलेल्या अतिक्रमणाची चौकशी होणार