नांदेड(प्रतिनिधी)-30 सप्टेंबर रोजी झालेल्या मारहाण प्रकरणातील फिर्यादीने गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलेल्या एका खुलाश्यानुसार मारहाण गुरूद्वारा माता साहिब येथील जमीन विक्री केल्याच्या कारणावरून झाली होती असे लिहिले आहे. मारहाण करणारा आरोपी गुरूद्वारा बोर्डाचा सदस्य आहे.
दि.30 सप्टेंबर रोजी अमरसिंघ रतनसिंघ नांदेडवाले या युवकाला मारहाण झाली. याबाबतचा गुन्हा 1 ऑक्टोबरच्या रात्री दाखल झाला. त्यामध्ये मारहाण करणारे मनप्रितसिंघ कुंजीवाले आणि अमितसिंघ बुंगई अशी नावे तक्रारीत लिहिली होती. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 349/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 323, 504, 506 आणि 34 सह भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे यांच्याकडे आहे.
त्यानंतर 1 ऑक्टोबरला दुपारी अमरसिंघ रतनसिंघ नांदेडवाले यांनी खुलासा असा शब्द कागदाच्या वर लिहुन गुन्हा क्रमांक 349 मध्ये पुरवणी जबाब घेण्याची विनंती केली आहे. या अर्जाच्या मजकुरात असे नमुद आहे की, गुन्हा क्रमांक 349 मधील आरोपी क्रमांक 1 अर्थात मनप्रितसिंघ कुंजीवाले हा गुरूद्वारा बोर्ड नांदेडचा सदस्य आहे. त्यानी आणि कांही जणांनी मिळून मातासाहिब गुरूद्वारा येथील जागा विक्री केली होती. या जागेच्या विक्रीबद्दल सिख समाजात रोष आहे. याबाबत कांही दिवसांपुर्वी विचारणा केली होती. त्याच कारणावरून 30 सप्टेंबर रोजी मारहाण झाली आहे असे या अर्जात लिहिले आहे. हा अर्ज वजिराबाद पोलीसांनी घेतला आहे. सोबतच पोलीस अधिक्षक कार्यालयातील आवक कक्षात हा अर्ज देण्यात आला आहे.
30 सप्टेंबरला झालेली मारहाण गुरूद्वारा मातासाहिब येथील जागा विक्रीवरुन झाली; तक्रारदाराने दिला नवीन खुलासा