नांदेड(प्रतिनिधी)-बनावटपणे 7 लाख 58 हजार 200 रुपये असलेली बॅग बळजबरीने चोरण्याची तक्रार आणणारा तक्रारदारच आरोपी निघाला. पोलीसांनी कांही तासातच त्याचा बनावटपणा उघड करून त्याच्या घरातून 6 लाख 89 हजार 300 रुपये जप्त केले आहेत. आज या बनावट तक्रारदाराला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.जी.फुलझळके यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
1 ऑक्टोबरच्या रात्री 8 वाजेच्यासुमारास बाफनाकडून आलेल्या कांही लोकांनी माझ्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकली आणि मी गाडी थांबवली तेंव्हा अनोळखी माणसाचा हात धरला तेंव्हा त्याने मला ढकलून दिले. माझ्या डोळ्यात मिर्ची गेली अशी ओरड मी केल्याने कांही लोक जमले. लोकांनी माझ्यासाठी पाणी आणले. मी डोळे आणि तोंड धुतले तेंव्हा माझ्या गाडीजवळ जावून पाहिले असता त्यातील 7 लाख 58 हजार 200 रुपये असलेली कॅरीबॅग मिळाली नाही. घडलेली घटना मी मालकाला सांगितली आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो अशी तक्रार मिलिंद बाबूराव बेंद्रे (35) रा.सुर्योदयनगर, चैतन्यनगर नांदेड यांनी दिली.
या फिर्यादीमध्ये लिहिले आहे की, मिलिंद बाबूराव बेंद्रे हे गजकेसरी सळई कंपनी जालना येथे 2012 पासून कार्यरत आहेत. ते सेल्स मॅनेजर आहेत. हे 7 लाख 58 हजार रुपये त्याला अतिक सेठ नावाच्या माणसाने दिले होते आणि ते पैसे त्याला दुसऱ्याला द्यायचे होते. आणि प्रवासादरम्यान तो आपली गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एल.3904 वर बसून ते पैसे घेवून जात होता आणि जबरी चोरी घडली.
घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, विमानतळचे अनिरुध्द काकडे, इतरवाराचे साहेबराव नरवाडे, वजिराबादचे जगदीश भंडरवार, शिवाजीनगरचे आनंदा नरुटे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, विमानतळचे पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. फिर्यादी मिलिंद बेेंद्रेला विचारलेल्या कांही प्रश्नांची उत्तरे तो बरोबर देत नाही. या शंकेवरून पोलीसांनी सोबत घेवून त्याच्या घरी गेले. घरी गेल्यावर मिलिंद बेंद्रे आकांड तांडव करू लागला. तेंव्हा पोलीसांनी त्याला बाहेर ठेवून घरात असलेल्या माऊलींना कांही प्रश्न विचारले आणि तो दिवसभर घरातच होता आताच घराबाहेर गेला असे त्या माऊलींनी सांगितले. कांही पैसे आहेत काय त्यावेळी त्या माऊलींनी पोलीसांना पैसे पण दाखवले ते पैसे 7 लाख 58 हजार 200 रुपये होते.
मिलिंद बेंेद्रेच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 296/2021 दाखल केला. यामध्ये भारतीय दंड संहितेची 392, 34 कलमे जोडण्यात आली. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्याकडे देण्यात आला. आज दि.2 ऑक्टोबर रोजी पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे पेालीस अंमलदार दारासिंग राठोड, बाबा गजभारे, जी.आर.भोसीकर, कलंदर आदींनी मिलिंद बेंद्रेला न्यायालयासमक्ष हजर केले. फिर्यादीच चोरटा निघाला ही बाब न्यायालयासमक्ष सविस्तरपणे मांडून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश सी.जी.फुलझळके यांनी मिलिंद बेंद्रेला दोन दिवस अर्थात 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
7 लाख 58 हजारांची तक्रार घेवून येणाराच झाला आरोपी; न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले