नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड गावातील सिमा सुरक्षा बलातील एका जवानाचे जोधपूर येथे एका अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. आपल्या ध्येयाच्या बळावर बीएसएफमध्ये प्रवेश मिळवलेला हा युवक संतोष गंगाधरराव सिदापुरे गेल्यानंतर दुखाची छाया पसरली आहे.
आध्यात्मीक वारसा असलेल्या एका कुटूंबात जन्म घेतलेल्या संतोष सिदापुरेचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा सोनखेड येथेच झाले. पुढे 5 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यालय सोनखेड येथे घेतले. लहानपणापासूच खेळ आणि व्यायामाची आवड असलेल्या संतोषने त्याकडे नेहमीच लक्ष केंद्रीत ठेवले. 12 नंतर आपल्या वडीलासोबत शेतीचे काम करण्यात संतोष सैन्यात जाण्याची तयारी करतच राहिले. दरम्यान त्याचे लग्न झाले आणि लग्नानंतर सुध्दा त्याने आपला व्यायाम व खेळ ही आवड सोडलीच नव्हती. त्यामुळे शरीर तंदुरूस्त राहिले आणि सन 2010 मध्ये त्याला सिमा सुरक्षा बलाचे बोलावणे आले. अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद संतोष सिदापुरेला झाला. त्यावेळी आता लग्न झाले आहे म्हणून सैन्याचा विचार बदला असे सांगण्यात आले. पण संतोष मात्र सैन्यातच गेले. राजस्थान येथील जोधपूरमध्ये त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर भारताच्या विविध सिमांवर काम केले. त्यांच्यातील गुणवत्ता पाहुन दरवर्षी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या गणतंत्र दिवस परेडमध्ये त्यांची निवड झाली. सलग तीन वर्ष संतोष सिदापुरेने गणतंत्र दिवस परेडमध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यासाठी त्यांना अनेक पदकेपण मिळाली आहेत. 2 ऑक्टोबर रोजी संतोष मागे दुर्देवाचा फेरा आला आणि एका अपघातात त्यांचे निधन झाले. संतोषच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. संतोषच्या निधनाचे वृत्त कळताच नांदेड जिल्ह्यावर आपला एक जवान गमावल्याचे दु:ख पसरले आहे.
नांदेड जिल्ह्याचा बीएसएफमधील जवान जिल्ह्याने गमावला