नांदेड,(प्रतिनिधी)- देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या तीन नवीन नियुक्त्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी ३ ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.
दिनांक ३ ऑक्टोबर २०२१ रोजी नांदेड जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे नवीन आदेश पारीत केले आहेत.त्यात देगलूरचे पोलीस निरीक्षक भगवान मरिबा धबडगे यांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी देत नियंत्रण कक्षात बोलावले आहे.त्यांच्या जागी धर्माबादचे पोलीस निरीक्षक सोहन कानीयन माछरे यांना देगलूर पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.भगवान धबडगे यांनी मागील चार वर्षाचा कार्यकाळ देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात सेवा देऊन निभावला आहे, आत नुकतीच देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे.त्यामुळे त्यांना नांदेडला बोलावण्यात आले आहे.
या दोन बदल्यांसोबत मरखेल पोलीस ठाण्यात आता नियंत्रण कक्षातील अनिल खेलबा चोरमले यांना नियुक्ती देण्यात आली आहे.बदली झालेल्या सर्वाना त्वरित प्रभावाने नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यास सांगितले आहे.पण धर्माबाद पोलीस ठाण्यात कोणाचा नंबर लागणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.