पाच चोऱ्यांमध्ये 11 लाखांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अख्खा ट्रक चोरीला गेला आहे. तसेच राम रहीमनगर इतवारा येथे घरफोडी झाली आहे. विमानतळ आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेनमधून एक दुचाकी चोरीला गेली आहे. या सर्व चोरीच्या पाच घटनांमध्ये 10 लाख 99 हजार 500 रुपयांचा एवेज चोरट्यांनी लांबवला आहे.
समीर वाजीद सय्यद याने 19 सप्टेंब रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजता आपला दहा टायरचा ट्रक क्रमांक एम.एच.40 बी.जी.8236 एमआयडीसीमध्ये उभा केला होता. पहाट झाली तेंव्हा तो ट्रक चोरीला गेला होता. 20 सप्टेंबरच्या पहाटेनंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा ट्रक चोरीचा गुन्हा 3 ऑक्टोबर रोजी दाखल केला आहे. या ट्रकची किंमत 8 लाख 21 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण येथील पोलीस अंमलदार पवार हे अधिक तपास करीत आहेत.
मोहम्मद नदीम बागवान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 सप्टेंबर रोजी सायंकाळी आपले घर बंद करून ते फळ खरेदी करण्यासाठी मुंबईला गेले होते. 3 ऑक्टोबरला परत आले तर त्यांच्या दाराचा कडीकोंडा काढून त्यातील कपाट फोडले. त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 9 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकासनगर जुना कौठा येथून 3 ऑक्टोबरच्या सकाळी 6.30 वाजता गणेश आनंदकुमार सोराळे यांची आई घरातील कचरा कचराकुंडीत टाकण्याकरीता बाहेर गेली असता त्यांच्या पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 1 तोळे वजनाची बोरमाळ बळजबरीने तोडून नेली आहे. एक तोळा सोन्याची किंमत या तक्रारीत 15 हजार रुपये दाखविण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार अधिक तपास करीत आहेत.
सुगंधा हॉस्पीटल, हर्षनगर येथे 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास संजय प्रेमदास गोपाळे यांची कन्या जेवन करून घराबाहेर शतपावली करत असतांना दोन अनोळखी चोरट्यांनी तिच्या हातातील 14 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बुरकुले अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेन येथून प्रदीप उत्तम तडपत्रे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी. 6380 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्रे हे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अख्खा ट्रक चोरीला गेला