नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड पोलीसांनी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी कॉपर वायर करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किंमतीची चोरीची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.
दि.2 ऑक्टोबर रोजी मुखेडचे पोलीस उपनिरिक्षक जी.व्ही. अन्सापुरे, पोलीस अंमलदार योगेश महेंद्रकर, प्रदीप शिंदे आणि हबीब पिंजारी रात्रीची गस्त करत असतांना चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.47 सी.8214 ही संशयीतरित्या फिरतांना दिसली. त्या चार चाकी वाहनाला थांबवले असता ते चार चाकी वाहन थांबले नाही. उलट लातूर रस्त्यावर जांब गावाकडे भरधाव वेगात पळाले. घडलेल्या प्रकाराची माहिती अन्सापुरे यांनी पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांना सांगितली. त्वरीत प्रभावाने नाकाबंदी करण्यात आली आणि त्या वाहनाचा पाठलाग केला. गाडी बॅरीकेटला चुकवून जांब चौकात न थांबता पुढे थांबली आणि गाडीतील तीन जण अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. तरी पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरिक्षक गजानन अन्सापुरे, गजानन काळे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर ठाकूर, सिध्दार्थ वाघमारे, शिवाजी आडबे, गंगाधर चिंतोरे, प्रदीप शिंदे आणि योगेश महेंद्रकर यांनी चोरट्यांचा पाठलाग करून एका खाजगी वाहनात बसून जाणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव अरबाज सादीक शेख (20) रा.मोमीनपुरा बीड, असे होते. त्याने सांगितल्यानुसार 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी मुखेड शहरात कॉपर वायर चोरी करण्यासाठी आलो होतो आणि 14 ऑगस्टच्या रात्री रामदास बाबूराव गौर यांच्या श्रीराम इलेक्ट्रीकल्समध्ये चोरी करून रिवायंडींगचे कॉपर वायर चोरले होते असे सांगितले. पोलीसांनी एक पोलीस पथक बीड येथे पाठवून शेख फारूख शेख नबी याला पकडून आणले. या दोघांकडून चोरी केलेले 50 हजार रुपयांचे कॉपर वायर जप्त करण्यात आले आहे.
कॉपरवायर चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडणाऱ्या मुखेड पोलीसांचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.