2 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-महिलांचे गंठण तोडणे, मंगळसुत्र चोरी, मोबाईल चोरी असे गुन्हे करणाऱ्या एका चोरट्याला रंगारेड्डी, तेलंगणा येथून पकडून आणल्यानंतर विमानतळ पोलीसांनी त्या चोरट्याकडून पाच गुन्ह्यांमधील 2 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील कांही दिवसांपासून रस्त्यावर चालणाऱ्या महिलांचे गंठण तोडणे, बोलत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावणे असे प्रकार सुरू होते. या प्रकरणांमध्ये आरोपी सापडत नव्हता. याला प्रतिउत्तर देत विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पोलीस पथकाने शेख अमीर उर्फ आमु शेख पाशा (22) मुळ रा.तानूर जि.अदिलाबाद ह.मु.नांदेड यास तांत्रिक सहाय्याने परिश्रम घेवून तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातून पकडून आणले.
शेख अमीर या चोरट्याकडून विमानतळ पोलीसांनी एक 15 ग्रॅम सोन्याचे नेकलेस, मनीमंगळसुत्र, मोबाईल, रोख रक्कम, मोटारसायकल असे चोरीचे साहित्य जप्त केले आहे. 2020 मधील 4 आणि 2017 मधील एक अशा पाच गु न्ह्यांची उकल केली आहे. या पाच गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला ऐवज आणि जप्त केलेला ऐवज यांची तुलना जवळपास 100 टक्के आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.आर.गिते, पोलीस अंमलदार बालाजी केंद्रे, रामदास सुर्यवंशी आदींनी शेख अमीर उर्फ आमुला तेलंगणा राज्यातून पकडून आणले होते. ऐवढ्या मोठ्या स्वरुपात एकाच वेळी पाच गुन्ह्यांची उकल या चोरट्यामुळे झाली आहे. सोबतच या चोरट्याने आणखी कांही गुन्हे केले आहेत काय याचाही पोलीस शोध घेत आहेत. चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करणाऱ्या विमानतळ पोलीसांचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
