नांदेड(प्रतिनिधी)-अवैध दारुची विक्री करण्यासाठी आणि ते काम करतांना कोणतीही कायदेशीर कार्यवाही करू नये यासाठी एका पोलीस अंमलदाराने 5 हजार रुपयांची लाच मागितली. हे पोलीस अंमलदार आणि त्यांचा सहकारी होमगार्ड यांच्याविरुध्द रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल होत आहे.
दि.4 ऑक्टोबर रोजी एका तक्रारदाराने तक्रार दिली की, रामतिर्थ पोलीस ठाण्यातील आदमपूर बिटचे पोलीस अंमलदार त्यांना अवैध दारु विक्री करतांना कार्यवाही करू नये यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागत आहेत. दि. 4 व 5 ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष लाचेच्या मागणी पडताळणी झाली. या पडताळणीत आदमपुर बीटचे पोलीस अंमलदार लक्ष्मण मारोती पाटील (55) बकल नंबर 1919 हे आणि त्यांचा सहकारी खाजगी इसम कपील लक्ष्मण भालेराव (26) हा होमगार्ड पैसे घेण्याची तयारी दाखवत होतो. आज 5 ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेचे 5 हजार रुपये स्विकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. रामतिर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधिक्षक धर्मसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक दत्ता केंद्रे, अरविंद हिंगोले, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, एकनाथ गंगातीर, जगनाथ अंतवार, सचिन गायकवाड यांनी पार पाडली.
लाच स्विकारण्याची ही माहिती देतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करत असतांना ते काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल. तसेच त्याने लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलेले ऑडीओ, व्हीडीओ क्लिप किंवा एसएमएस असतील तर त्या संबंधाने लाच लुचप प्रतिबंधक खात्याला माहिती द्यावी. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचार संबंधाचे कांही कागदपत्र माहिती अधिकारात मिळवले असतील त्याबाबतची माहिती द्यावी. कोणी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याने शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल ही माहिती सुध्दा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावी. संबंधीत भ्रष्टाचाराची माहिती टोल फ्री क्रमांक 1064(2) कार्यालयाचा फोन क्रमांक 02462-351512 आणि पोलीस उपअधिक्षक धर्मसिंग चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक 9545255594 यावर सुध्दा ही माहिती देता येईल. जेणे करून लाच मागणीवर वचक आणता येईल.