शिक्षा झालेला फरार आरोपी वजिराबाद पोलीसांनी 24 वर्षांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-24 वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने औरंगाबाद येथून पकडून आणले आहे. न्यायालयाने त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे.
सन 1997 मध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 241/1997 भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 338 प्रमाणे दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेला आरोपी पंडीत बाबूलाल शिंगरुळे (42) हा सध्या सातारा परिसर औरंगाबाद येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.डी.निलपत्रेवार,पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील, पोलीस अंमलदार बालाजी कदम, पंडीत कदम, शेख इमरान यांनी सायबर विभागातील पोलीस अंमलदार राजू सिटीकर यांच्या मदतीने या आरोपीचा शोध घेतला असता तो औरंगाबाद येथे असल्याचे समजले. 24 वर्षापुर्वीचा फोटो आणि आता तो व्यक्ती दिसत असलेली परिस्थिती यात मोठे अंतर होते. तरीपण संपूर्ण बारकाईने तपास करून तो शिक्षा झालेला फरार आरोपी पोलीसांनी पकडून आणला आणि न्यायालयाने त्याला शिक्षा भोगण्यासाठी जिल्हा कारागृहात पाठवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *