नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्वीन शुध्द प्रतिपदा. दरवर्षी या दिवशी घटस्थापना होते. आई दुर्गेची प्रार्थना केली जाते. जनतेसाठी आज शासनाने सुद्धा सर्वच मंदिरांची दारे उघडली. प्रशासनाने सुध्दा मंदिराची व्यवस्था तपासली आणि अत्यंत साध्या पध्दतीत नवरात्र उत्सव सुरू झाला आहे.
काल दि.6 ऑक्टोबर पासूनच घटस्थापना, शारदीय नवरात्र संदर्भाने घरा-घरातील महिलांनी तयारी सुरू केली होती. पुजेसाठी लागणारे साहित्य जमा केले जात होते. बाजारात सुध्दा गर्दी होती. आज सकाळीच सर्व मंदिरांची दारे उघडी झाली. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, यांनी सुध्दा अनेक धार्मिकस्थळांमध्ये जावून दर्शन घेतले. मंदिराची कोविड नियमावलीनुसार काय तयारी करण्यात आली आहे. या व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यातील उणिवा बाबत मंदिर प्रशासनाला सूचना दिल्या.
आज सकाळपासूनच अनेक जागी मॉ दुर्गेच्या मुर्ती उपलब्ध होत्या. त्यानुसार कांही मंडळांनी आणि कांही घरगुती लोकांनी छोट्या-छोट्या मुर्ती खरेदी केल्या. वाजत गाजत कोणतीच मिरवणूक काढण्यात आली नाही. सायंकाळपर्यंत देवी मूर्ती स्थापनेची तयारी सुरूच होती. घरा-घरांमध्ये होणाऱ्या घटस्थापनेत आई दुर्गा प्रतिमा स्थापन करून पुजा करण्यात आली. अनेक ठिकाणी आरती झाल्यावर प्रसाद वितरण झाले. बाजारामध्ये सुध्दा आज दिवसभर रोजच्या मानाने थोडीशी गर्दी जास्तच होती. त्या गर्दीतील महिला आपल्या घरच्या पुजेसाठी साहित्य खरेदी करत होत्या. आज पासून सुरू झाला घटस्थापनेचा समारोप दसऱ्याच्या दिवशी होत असतो. या दरम्यान अनेक महिला पुरूष आपल्या पायात वाहण घालत नाहीत. अशा प्रकारे अत्यंत साध्या पध्दतीत कोरोनाच्या त्रासातील दुसऱ्या वर्षात नवरात्र महोत्सव सुरू झाला आहे.

