बोगस माहिती अधिकार समितीच्या एका पत्रावर म्हणे अतिक्रमण उठले
नांदेड(प्रतिनिधी)-मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्या सतत संघर्षमय पाठपुराव्यामुळे आरटीओ कार्यालय दलालमुक्त व अतिक्रमण मुक्त झाले असतांना बोगस समितीच्या नावावरील लोकांच्या बातम्या अंतरराष्ट्रीय पत्रकार प्रसिध्द करत आहेत.

मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या माहितीनुसार आरटीओ विभागात सुरू असलेल्या बेबंद शाहीसंदर्भाने 5 जून 2021 रोजी पत्र देवून आरटीओ अविनाश राऊत यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यायासमोर आपले उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त ढाकणे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वियसहाय्यक संकेत भोंडवे यांच्या मार्फत 28 जुलै रोजी पत्र पाठविण्यात आले. 5 ऑगस्ट पासून चार दिवस आरटीओ कार्यालयासमोर कॉ.गायकवाड आणि कॉ.केंद्रे यांनी उपोषण सुरू केले. 31 ऑगस्ट रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यात अतिक्रमण काढावे आणि दलाली पध्दत बंद करावी या मागण्या होत्या. 27 सप्टेंबर रोजी व्यापक आंदोलनात हा प्रकार पुन्हा मांडला गेला. त्यानंतर या आंदोलनाला यश आले आणि आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या दलाली बंद झाली की नाही माहित नाही पण आरटीओ कार्यालसमोरील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक नांदेड यांनी केलेली आहे. या संदर्भाने कॉ.गंगाधर गायकवाड यांनी पोलीस अधिक्षकांना भेटून त्यांना धन्यवादपण दिले आहेत. या पुढे चमकोगिरीसाठी शस्त्र परवाने घेवून त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुध्द आम्ही आंदोलन उभारू असेही कॉ.गंगाधर गायकवाड यांनी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात लिहिले आहे.
कॉ.गंगाधर गायकवाड यांनी चालवलेल्या आंदोलनाला यश आले. पण माहिती अधिकार संरक्षण समिती या बोगस माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीर यांच्या प्रयत्नामुळे आरटीओ कार्यालयातील अतिक्रमण उठले अशी कोल्हेकुई तयार करून त्या संदर्भाच्या बातम्या अंतर राष्ट्रीय पत्रकारांनी प्रसिध्द करून व्हॉटसऍप संकेतस्थळावर व्हायरल केल्या आहेत.
