नांदेड(प्रतिनिधी)-कैलास बिघानीयासह एकूण 11 आरोपींविरुध्द पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका कायदा जोडण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व लोकांचे तुरूंग वास्तव्य वाढले आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 जुलै रोजी सायंकाळी विक्की ठाकूर यांचा खंजीरने भोसकून आणि पिस्तुलातून गोळ्या झाडून खून झाला होता आणि त्यावेळी सोबत असलेला विक्की ठाकूरचा मित्र सुरज खिराडे यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणी गुन्हा क्रमांक 176/2021 ची नोंद झाली होती. याप्रकरणात पोलीसांनी नितीन जगदीश बिघानीया, कैलास जगदीश बिघानीया, ज्योती जगदीश बिघानीया, अंजली नितीन बिघानीया, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील, कृष्णा उर्फ किन्ना छगनसिंह परदेशी, अशोक गंगाधर भोकरे, सोमेश उर्फ सोम्या सुरेश कत्ते, दिगंबर टोपाजी काकडे, मुंजाजी उर्फ गब्या बालाजी धोंगडे आदी 11 जणांना अटक झाली होती. सध्या हे सर्व जण तुरूंगात आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी या गुन्ह्यामध्ये मकोका कलम वाढविण्याचा प्रस्ताव पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्याकडे पाठवला होता. तो प्रस्ताव 13 ऑक्टोबर रोजी मंजुर झाला आहे. या गुन्ह्यात आता मकोका कायदा वाढला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्याकडे वर्ग झाला आहे. इतवारा पोलीसांनी यापुर्वी सुध्दा रिंदा गॅंगच्या आठ आणि लखन ठाकूर गॅंगच्या सहा जणांविरुध्द मकोका कार्यवाही केली आहे.
कैलास बिघानीया गॅंगविरुध्द मकोका कायदा जोडला