अत्यंत वैभवशाली जिअर स्वामी मठाला लागली उतरती कळा; मठाच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर अनेकांचा डोळा

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरात जिअर स्वामी मठात सध्या वेगवेगळ्या विषयांवरून वादंग सुरू आहे. वादंग देवाची पुजा, अर्चा असा दाखवला जातो. त्यास कायद्याचा रंग दिला जातो. पण मुळात वादंग मठाच्या कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीवरून सुरू आहे. या मठाचे मठाधीश महंत हे या संपत्तीचे मालक असतात. आजपर्यंत हीच पद्धती आहे. पण आता अनेकांनी त्यावर डोळा ठेवला आहे. सध्याचे महंत सुद्धा काही लोकांच्या सांगण्यावरून मठाचा कारभार चालवत असल्याने गोविंदाच्या भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
नांदेड येथे श्री लक्ष्मणाचार्य स्वामी यांनी जिअर स्वामी मठाची स्थापना केली. मठाचे मुळ स्थान ऋषीकेश उत्तरप्रदेश येथे आहे. सोबतच जालना येथे याच मठाच्या मालकीची संपत्ती आहे. तेथे नरनारायण मंदिर आहे. श्री लक्ष्मणाचार्य स्वामी जिअर स्वामी मठात भगवान गोविंदाची मुर्ती प्रतिष्ठापणा केली आणि या मठाचे भक्त हळूहळू वाढत गेले. सुरूवातीच्या काळात नांदेडच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या भगवान बालाजी मंदिरातील भगवंतांची मुर्ती जिअर स्वामी मठात येत होती आणि तिला निरोप देऊन दसऱ्याचे सिमोल्लंघन होत होते. मुख्य रस्त्यावरील भगवान बालाजी मंदिरातील व्यवस्थापकांनी पालखी जिअर स्वामी मठात जाणार नाही, असा निर्णय घेतला. त्यानंतर श्री लक्ष्मणाचार्य स्वामी यांनी आपल्या मठात ब्रम्होत्सव साजरा करण्याची प्रथा दसऱ्याच्या सणात  आणली. त्यावेळी रामनाथसिंह रावत, मन्नासिंह तेहरा, गयादिनसिंह रावत, विठ्ठलसिंह चौधरी, बकंटसिंह तेहरा, विठ्ठलसिंह तेहरा, सुरजसिंह माला, सुरज प्रसाद यादव, सुरजसिंह तेहरा आणि त्यांचे सर्व कुटूंबीय स्वामी लक्ष्मणाचार्यजींच्या आदेशानुसार मंदिराची सेवा करीत होते. हे मंदिर गाडीपूरा भागात असल्याने या भागाची संरक्षक मंडळी राजपूतच होती. सर्व राजपूत समुदायाने मोठ्या भक्तीभावाने या मठाच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतला आणि देवाची पुजा, अर्चा अत्यंत उत्कृष्टपणे सुरू होती.
स्वामी लक्ष्मणाचार्य यांनी आपल्या जीवन काळात आपल्या मठाचा उत्तराधिकारी म्हणून व्यंकटेश नावाच्या व्यक्तीची घोषणा केली. पण व्यंकटेशाच्या गाथा पाहिल्या आणि ऐकल्यानंतर स्वामी लक्ष्मणाचार्य यांनी या मठातून त्यांची उचलबांगडी केली. त्यानंतर स्वामी केशवाचार्य हे जिअर स्वामी मठाचे मठाधिश झाले. आज मठाचे महंत असलेले स्वामी सचिनानंद शास्त्री हे नरनारायण मंदिर जालना येथे पुजारी होते. या मठाच्या इतिहासात मोठा घोळ 1999 मध्ये झाला. त्यावर्षी जिअर स्वामी मठाचे तत्कालीन महंत स्वामी केशवाचार्य यांची मठाच्या शेतात, पावडेवाडी येथे खून झाला. त्यानंतर जालना येथील नरनारायण मंदिराचे पुजारी स्वामी सच्चिदानंद शास्त्री यांना या मठाची महंत पदवी मिळाली. स्वामी केशवाचार्य यांच्या मृत्यूनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात तीन आरोपींना पकडण्यात आले होते. व्यंकटेश मात्र फरार राहिला. खटल्याच्यादरम्यान कोणत्याही आरोपीला शिक्षा झाली नाही. त्यानंतर व्यंकटेश या माणसाने नांदेडमधील काही लोकांना हाताशी धरून जिअर स्वामी मठावर जबरदस्तीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आजही उपलब्ध आहे. काही अनेक कारणांनी मठाचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्याचा निर्णय अद्याप आलेला नाही.
स्वामी सच्चिदानंद शास्त्री मठाचे मठाधिश झाल्यानंतर नांदेडमधील या बालाजी मंदिराशी कधीच संपर्कात नसलेल्या लोकांना सोबत घेऊन मठाचा कारभार चालवू लागले. मठाची पावडेवाडी येथे कोट्यवधी रूपयांची शेतजमीन आहे. सोबतच गाडीपूरा भागात या मठाची मोठी संपत्ती आहे. त्यामुळे या मठाच्या संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्यांनी वेगवेगळ्या युक्त्या, प्रयुक्त्या सुरू केल्या. सध्याचे मठाधिश सुद्धा यामध्ये काही लोकांच्या सांगण्यावरून सामील झाले. यंदाचा दसरा उत्सव आला तेव्हा शासनाच्या नियमांचा आधार घेऊन महंतांनी कोणताही कार्यक्रम घेणार नाही, असे जाहीर केले. मागील वर्षी सुद्धा दसरा महोत्सव साजरा झाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या उत्सवात भक्तांची पण खुप इच्छा होती की, एक वर्षे न झालेला उत्सव यंदाच्या वर्षी साजरा करावा. त्यासाठी कोवीड नियमावली बंधनकारकच होती.
राजपूत समाजातील ज्या महान व्यक्तींनी या मंदिराच्या उत्थानात आपली मेहनत लावली, त्यांची नावे मठाच्या विश्वस्त मंडळात होती. त्यातील काही मंडळी आज नाहीत तर काही मंडळी आहेत आणि ते बाहेर राहतात. नांदेडमध्ये राहणाऱ्या काही लोकांना आपल्या आजोबांचे, आपल्या वडीलांचे या मंदिरातील परिश्रम लक्षात घेता आपले नाव त्यांच्या जागी यावे, अशी त्यांची इच्छा आहे आणि येथूनच घोळ सुरू झाला. ज्यामध्ये आजच्या महंतांना ही मंडळी नको आहेत. यातील काही जण महंतांच्या हक्कात आहेत. यावरूनच दसरा महोत्सवात वाद सुरू झाला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. पोलिसांनी मला धोका असताना मदत केली नाही, अशी प्रसिद्धी आजचे महंत सच्चिदानंद स्वामी यांनी केली. पण प्रत्यक्षात त्यांनी अर्ज दिल्यानंतर इतवारा पोलिसांनी गाडीपूरा भागातील 14 जणांना नोटीस जारी केल्या आणि त्यानुसार मठाच्या कामकाजात तुम्ही हस्तक्षेप करू नये असा त्या नोटीसचा मतीतार्थ आहे. दसऱ्याच्या दिवशी तर भगवंतांचे सिमोल्लंघन प्रतिकात्मक रूपात करण्यासाठी भक्तांनी लावलेल्या फिल्डींगवर महंत सच्चिदानंद शास्त्री यांनी पोलिसांचा हस्तक्षेप घडवून आणल्यामुळे भगवंतांचे सिमोल्लंघन झालेच नाही आणि त्यानंतर महंतांनी पोलीस सहकार्य करत नाहीत, असा आरोप केला.
महंतांनी हा आरोप करताना आपण 1999 पासून आल्यानंतर आजपर्यंत काय घडले या इतिहासावरून नजर फिरवण्याची गरज आहे. नरनारायण मंदिरातील संपत्ती विक्री झाली, असेही लोक सांगतात. ती संपत्ती सुद्धा व्यक्तीगत नव्हती, मठाची होती. नांदेडमधील संपत्तीचा अभिलेख कसा बदलता येईल यावर सुद्धा काम सुरू आहे आणि हे काम करणारी मंडळी आणि त्यांचा इतिहास पाहिला तर इतरांचे घर लुबाडून आपल्या घरात मार्बलचे बाथरूम त्यांनी बनविले आहे, हे सत्यच आहे. आजपर्यंत इतिहास आहे की, भगवंतांच्या संपत्तीमध्ये ज्यांनी-ज्यांनी ढवळाढवळ केली त्यांची कधीच भले झालेले नाही. जी मंडळी व्यंकटेशला साथ देण्याच्या तयारीत पडद्यामागून कायद्याच्या आणि इतर प्रकारच्या कठपुतळ्या चालवत आहेत, त्यांनी सुद्धा भगवंतांच्या संपत्तीमध्ये ढवळाढवळ करून काय होईल याचा अंदाज घेण्याची आवश्यकता आहे.
या संदर्भाने इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मंदिरातील वाद हा पोलीस विषय नाही. सोबतच सार्वजनिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आली तर त्यात अग्रक्रमाने हस्तक्षेप करणे आमचे कर्तव्यच आहे. महंत सच्चिदानंद शास्त्री यांच्या मी संपर्कात असतो, त्यांनी सांगितलेल्या मी मानतो. ज्या कायद्याच्या दृष्टीकोणातून करणे आवश्यक आहे, त्या सर्व मी करतो असे नरवाडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *