नांदेड(प्रतिनिधी)-एका पोक्सो प्रकरणात चार जणांना येथील पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी परिवेक्षाधिन अपराधी कायद्यानुसार दोन वर्षांच्या बंदपत्रावर आज मुक्तता केली आहे. त्यांनी अल्पवयीन बालिकेच्या विनयभंग केल्याचा गुन्हा न्यायालयासमक्ष सिध्द झाला नाही. पण इतर गुन्हे सिध्द झाले आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेजारी राहणारे धुमाळे कुटूंबिय त्यांच्यासोबत नेहमीच भांडण करून त्यांना मारहाण करतात. 11 जानेवारी 2020 रोजी कांही सामान आणण्यासाठी त्या आपल्या शेजारी असलेल्या दुकानाकडे जात असतांना धुमाळे कुटूंबियातील लोकांनी आमच्याविरुध्द पोलीस ठाण्यात केस का केली असे म्हणून तिला अत्यंत अश्लील शिवीगाळ केली. 13 जानेवारी 2020 रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास मनोज केशव धुमाळे, केशव मरीबा धुमाळे, कृष्णा केशव धुमाळे, अंजनाबाई केशव धुमाळे हे सर्व त्यांच्या घरात घुसले आणि त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी माझी लहान मुलगी हिचा वाईट उद्देशाने हात धरुन विनयभंगपण केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 29/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 354, 323, 504, 506 आणि 34 सह गुन्हा दाखल केला. पुढे या प्रकरणात पोक्सो कायद्याचे कलम 7 वाढले. पोलीस उपनिरिक्षक आर.एम.घोळवे यांनी या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
न्यायालयात या प्रकरणी 5 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. त्यात चारही आरोपींना न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323, 504, 506 आणि 34 नुसार दोषी मानले. या आरोपींना शिक्षा देण्याऐवजी न्यायालयाने त्यांना 2 हजार रुपयांच्या चांगल्या वर्तवणूकीच्या एका वर्षाच्या बंद पत्रावर मुक्त केले. या एका वर्षाच्या कालखंडा त्यांनी आपल्या वागणुकीतून कांही चुकीचे घडविले तर त्यांना शिक्षा होईल. पोक्सो कायद्यातील कलम 7 आणि 354 यामधून आरोपींची मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षाची बाजून ऍड. एम.ए.बत्तुल्ला(डांगे) यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून या प्रकरणात नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी यांनी काम पाहिले.
चार आरोपींना आज शिक्षा न देता परिवेक्षाधिन कायद्यानुसार एका वर्षाच्या बंद पत्रावर मुक्तता