नांदेड(प्रतिनिधी)- दि.16 ऑक्टोबर रोजी जुन्या नांदेड भागातील पाठक गल्ली येथे झालेल्या मारहाणीच्या संदर्भाने दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात जीव घेणा हल्ला आणि दुसऱ्या गुन्ह्यात गंभीर दुखापत अशी सदरे जोडली आहेत.
दि.16 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन सुरू असतांना पाठक गल्लीमध्ये रात्री 9.30 वाजेच्यासुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. याचे कारण उसने दिलेले पैसे असे होते. या घटनेत एका व्यक्तीच्या कपाळाला जखम झाली. एकाच्या डाव्या हाताला झाली आणि एकाचे डोके फुटले होते. या सर्वांनी अगोदर स्वत:वर उपचार करून 17 ऑक्टोबर रोजी आप-आपल्या तक्रारी दिल्या आहेत.
यातील सचिन पंढरीनाथ कुलथे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर रोजी पिंटू माळवदकर, गजानन मामीडवार, चेतन मामीडवार, रहिल मामीडवार आणि इतर तीन असे सातजण आले आणि सचिन कुलथेच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. सचिनने दिलेले उसने पैसे परत मागितले या कारणावरून हे भांडण झाले. तलवार, लोखंड रॉड या हत्यारांच्या सहाय्याने जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या तक्रारीनुसार इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 272/2021 दाखल केला आहे. ज्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 326, 324, 307, 143, 147, 148, 149, 323, 452, 504, 506 आणि भारतीय हत्यार कायद्याचे कलम 4/25 जोडण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक मुत्तेपोड हे करीत आहेत.
या घटनेच्या संदर्भाने नरसींग लक्ष्मण माळवदकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी उसने दिलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी 12 ऑक्टोबर रोजी सुध्दा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि 16 ऑक्टोबर रोजी पाठकगल्लीत सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला केला. इतवारा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 271/2021 दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेची 326, 143, 148, 149, 504 आणि भारतीय हत्यार कायद्याची 4/25 अशी कलमे जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बेग यांच्याकडे देण्यात आला आहे.
पाठकगल्लीतील मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल