कोरोना लसीकरणाच्या सर्व व्यापक सहभागासाठी जिल्ह्यात 75 तासांचे अभूतपूर्व सत्र- डॉ विपीन

मिशन कवचकुंडल अंतर्गत विशेष मोहिम
नांदेड (प्रतिनिधी)- कोविड-19 बाबत जिल्ह्यातील नागरिकांनी बाळगलेली दक्षता, आरोग्य विभागाने घेतलेली तत्परता आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यास यश मिळाले आहे. तथापि अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसून जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकांची यात जीवत हानी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. हे लसीकरण नांदेड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यापासून तांड्यांपर्यंत ते शहरापासून महानगरापर्यंत प्रभावी करण्याच्यादृष्टिने दिनांक 21 ऑक्टोंबर रोजीच्या सकाळी 8 पासून ते 24 तारखेच्या सकाळी 10 पर्यंत अभूतपूर्व अशी 75 तासांची विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासह या लसीकरण मोहिमेत स्वयंमस्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी नागरीकांना केले आहे.
या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून यासाठी लागणारे अत्यावश्यक मनुष्यबळाचेही नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या मदतीसाठी महसूल विभाग, पंचायत समिती, बालविकास विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांचेही सहकार्य घेतले जात आहे. ही मोहिम तीन शिफ्टमध्ये राबविली जात आहे. यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिक्षक समन्वय साधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 75 तासांचे हे विशेष लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी सिद्ध झाले आहे. याचबरोबर या मोहिमेत स्थानिक महाविद्यालय विद्यार्थी, स्काऊट-गाईड, राष्ट्रीय सेवायोजना यातील युवकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक यांच्या सक्रिय सहभाग घेण्याच्यादृष्टिने नियोजन केले गेले आहे. ज्या वार्डामध्ये, गावांमध्ये लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला अशा ठिकाणी प्राधान्याने हे लसीकरण सत्र मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *