नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेचे गंठण तोडून हैद्राबाद येथे पळून गेलेल्या एका आरोपीला वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने पकडून आणले आहे.
दि.26 जून 2021 रोजी रेखा सुरेश इंगोले ही महिला आपल्या पतीसोबत मोटारसायलवर जात असतांना खडकपूरा भागातील पाण्याच्या टाकीजवळ महिन्याच्या गळ्यातील गंठण तोडून दोन चोरटे पळून गेले. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलीसांनी हरिश उर्फ हऱ्या देविदास शर्मा यास पकडले. त्याच्याकडून महिलेचे तोडलेले गंठण जप्त करण्यात आले होते.
हरिश शर्मासोबत असलेला दुसरा चोरटा हैद्राबाद येथे पळून गेला होता. वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील, पोलीस अंमलदार व्यंकट गंगुलवाड, दत्ता जाधव, संतोष बेल्लूरोड यांना हैद्राबाद येथे पाठवले. या पोलीस पथकाने तेथून शेख अमीर उर्फ आमु शेख पाशा यास पकडून आणले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
महिलेचे गंठण तोडून हैद्राबादला पळालेल्या आरोपीला वजिराबाद पोलीसांनी पकडून आणले