अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून आज सज्ञान झालेल्या युवकाला सक्तमजुरी

नांदेड,(प्रतिनिधी)-सन २०१७ मध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन बालकाने सात वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर केलेल्या अत्याचार प्रकरणात येथील पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी त्यावेळी अल्पवयीन असलेला आणि आज सज्ञान झालेल्या युवकाला दोन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.२० जून २०१७ रोजी त्यांची सात वर्षाची अल्पवयीन बालिका शेजाऱ्याकडे  मिक्सर आणण्यासाठी गेली तेंव्हा लोकेश उर्फ संजय शिवाजी राठोड वय तेंव्हा १७ वर्ष चार महिने याने या सात वर्षीय बालिकेला आपल्या घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र.३४९/२०१७ भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ (२) (आय), ३७७ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ३ आणि ४ नुसार गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या सक्षम मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, गजानन मोरे आणि परशुराम मराडे यांनी त्यावेळी अल्पवयीन असलेल्या लोकेश उर्फ संजय शिवाजी राठोडला ताब्यात घेतले. यानंतर जुवेनाईल जेस्टीस बोर्डाकडे लोकेश उर्फ संजय शिवाजी राठोडची तपासणी झाली. आणि बोर्डाने परवानगी दिल्यानंतर त्याचा खटला नियमित न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयीन खटल्याचा क्रमांक ३/२०१८ असा आहे.
या प्रकरणात न्यायालया समक्ष नऊ साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी आता संज्ञान झालेला युवक लोकेश उर्फ संजय शिवाजी राठोड यास भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ प्रमाणे दोषी जाहीर करुन त्यास दोन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे पोलीस अंमलदार बालाजी गाडेकर, मुसळे यांनी तयारी केली होती. सुरुवातीच्या कालखंडात सरकारी वकील अ‍ॅड.संजय लाठकर यांनी या प्रकरणाचे सादरीकरण न्यायालयात केले होते. त्यानंतर अ‍ॅड.एम.ए.बतुल्ला (डांगे) यांनी या प्रकरणात सादरीकरण करुन अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला  शिक्षे पर्यंत पोहंचवले. या खटल्यात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *