नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथे एकापेक्षा जास्त घरे फोडून चोरट्यांनी 1 लाख 34 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि किराणा साहित्य असा 25 हजार 285 चा ऐवज लंपास केला आहे. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीाल गेल्या आहेत. मुदखेड ते भोकर रस्त्यावर साळवाडी वळणावर चोरीचा प्रयत्न झाला आहे.
सोपान मारोती बहिरेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.30 ते 2 वाजेदरम्यान मौजे बोरगडी येथील त्यांचे व इतरांचे घर फोडून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 34 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक जाधव ह्या अधिक तपास करीत आहेत.
रामलू शेषराव सातेलू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जारीकोट येथील त्यांचे किराणा साहित्याचे दुकान 26 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 ते पहाटे 6 वाजेदरम्यान कोणी तरी दुकानाच्यावरचा टीनपत्रा कापून फोडले त्यातील 22 हजार रुपये रोख रक्कम आणि 3 हजार 285 रुपये किंमतीचे किराणा साहित्य असा 25 हजार 285 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार नागुलवार अधिक तपास करीत आहेत.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंब्रीज शाळेजवळून 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 अशा एक तासात शिवशंकर संभाजी लालवाड यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एल.3115 चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
अभिजित अपार्टमेंट येथून 25 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 26 ऑक्टोबरच्या पहाटे 6 वाजेदरम्यान गजानन दिगंबर मगर यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एस.9130 ही चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
चोऱ्यांच्या अनेक घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास