नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात चार जणांनी एका अल्पवयीन बालकाला मारहाण करून त्याला लुटण्याचा प्रकार घडला आहे. लोहा पोलीसांनी अल्पवयीन बालकाची तक्रार घेवून हा गुन्हा दाखल केला. हिमायतनगर येथे चोरट्यांनी किटक नाशक औषधी चोरली आहे आणि व्हीआयपी रोडवर एक चोरी घडली आहे.
आदेश पिराजी हंकारे (14) हा अल्पवयीन बालक बोरगाव (अ) ता.लोहा येथील रहिवासी आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजेच्यासुमारास शिवाजी चौकाजवळील वेलकम हॉटेलजवळ तो थांबला असतांना 4 जण तेथे आले आणि त्यांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडील 20 हजार रुपयांचा मोबाईल आणि 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.22 ए.यु.0406 बळजबरीने चोरून नेली आहे. लोहा पोलीसांनी अल्पवयीन बालकाची तक्रार घेवून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
सतिश विठ्ठलराव पिनलवार यांची श्रेयस कृषी सेवा केंद्र नावाची दुकान पोटा ता.हिमायतनगर येथे आहे. 27-28 ऑक्टोबरच्या रात्री कोणी तरी चोरट्यांनी त्या दुकानाचे शटरला लावलेले कुलूप तोडून त्यातून 64 हजार 800 रुपये किंमतीची किटक नाशक औषधी चोरून नेली आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
नामदेव दिगंबर आकरापे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27-28 ऑक्टोबरच्या रात्री गजेंद्र ऍटो गॅरेज, व्हीआयपी रोड येथे त्यांनी आपल्या मालकीचा ऍटो उभा केला होता. या ऍटोतून 2 हजार रुपयांची सिट कोणी तरी चोरली. सोबतच कांही नुकसान केले. त्याची किंमत 15 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन बालकाची फिर्याद घेवून लोहा पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला