नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 84 हजार पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 5167 रुपये गणवेश भत्ता देण्याची मंजुरी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेनंतर अपर पोलीस महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्या आदेशाने मिळाली आहे. राज्य शासनाने 43 कोटी 40 लाख 28 हजार रुपये पोलीसांना गणवेश भत्ता म्हणून मंजुर केले आहेत.
राज्यातील पोलीस अंमलदारांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता देण्यात यावा असे एक पत्र ऑक्टोबर 2021 या महिन्यात अपर पोलीस महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे. पोशाख, राहुटी व भांडारे या उद्दीष्टाखाली शासनाने 84 हजार पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एकूण 43 कोटी 40 लाख 28 हजार रुपये निधी मंजुर केला आहे. त्यातील सध्या गणवेश भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतर निधी प्राप्त होताच तो संबंधीत पोलीस घटकप्रमुखांना हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.
या संदर्भाने नांदेड जिल्ह्यात गणवेश घोटाळा सुरू आहे. पण राज्य शासनाने दिलेली ही रक्कम पोलीस कर्मचाऱ्यांना आता साहित्याच्या ऐवजी रोख स्वरुपात दिली जाणार आहे. या आदेशाची प्रत राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधिक्षक यांना पाठविण्यात आली आहे.
राज्यातील 84 हजार पोलीस अंमलदारांना 5167 रुपये गणवेश भत्ता मिळणार