नांदेड(प्रतिनिधी)-लुटमार करणाऱ्या एका गुन्हेगाराची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाल्यानंतर त्याला गजाआड करण्यात आले आहे. त्याने लोहा, सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी या गुन्हेगाराला लोहा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
भेंडेगाव ता.लोहा येथील वैभव उर्फ रावण किशन भोसले (24) हा सध्या गावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, देविदास चव्हाण, विठ्ठलजी शेळके, बालाजी यादगिरवाड, मोतीराम पवार, किरण बाबर, हेमंत बिचकेवार आणि आली जनाब अफजलखान पठाण यांना रावणला पकडून आणण्याच्या कामगिरीवर पाठवले.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने वैभव उर्फ रावण किशन भोसले (24) यास भेंडेगाव ता.लोहा येथून ताब्यात घेतले त्याने लोहा पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा क्रमांक 184 आणि 145/2021 केल्याचे सांगितले. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा क्रमांक 138 आणि 140/2021 केल्याची कबुली दिली. गुन्हा करतांना त्याने वापरलेली एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी रावणची रवानगी पोलीस ठाणे लोहा येथे झाली आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखा पथकाचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने रावणाला पकडले