नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी घडली आहे. लोहा येथे एक घर फोडण्यात आले आहे. किनवट गावात मोबाईल चोरीला गेला आहे आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 2 लाख 11 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
संभाजी रोणाजी गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनी मंदिर लोहाजवळ त्यांचे घर आहे. दि.31 ऑक्टोबरच्या दुपारी 12.30 ते 1 वाजेदरम्यान फक्त अर्धा तासात त्यांचे घर फोडून कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिणे आणि 26 तोळे चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम 50 हजार असा एकूण 1 लाख 57 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.आर.कऱ्हे अधिक तपास करीत आहेत.
अभिनंदन शामराव पाचपुते हे शिक्षणासाठी गोकुंदा किनवट येथे राहतात. 28 ऑक्टोबरच्या रात्री 3 ते 4.30 अशा दीड तासाच्या वेळेत त्यांच्या खोलीतून कोणी तरी चोरट्यांनी 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मामीडवार अधिक तपास करीत आहेत.
रामचंद्र विठोबा नागसाखरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.20 ते रात्री 8.50 या दरम्यान ते हॉटेल मिडलॅंड समोरून फोनवर पायी बोलत जात असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भगवान सावंत अधिक तपास करीत आहेत.
शेख चॉंद शेख मुर्तुजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी साई झेरॉक्स टिळकनगर येथे उभी केलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एन.1217 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
लोहा येथे घर फोडून 1 लाख 57 हजारांची चोरी