नांदेड(प्रतिनिधी)- व्यंकटराव तरोडेकर मार्केटसमोरील पादचारी रस्ता(फुटपाथ) गिळंकृत करणाऱ्या या इमारतीच्या कंत्राटदाराने इमारतीमध्ये अत्यंत मोठ-मोठे घोळ केले आहेत. पण महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासनिक अधिकारी यांनी या कंत्राटदारांच्या सात पिढ्यांचे भले करण्याचा विडाच उचलेला आहे. त्यामुळे कांही बोलून, लिहुन काही होणार नाही. आता नांदेडच्या सर्वसामान्य जनतेने आमची संपत्ती विविध कंत्राटदारांच्या घशात टाकणाऱ्या महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याची गरज आहे. कांही जण सांगतात या कंत्राटदारासोबत या इमारतीच्या भागीदारीमध्ये अलिखित असलेले अनेक भागीदार आहेत. त्यांची नावे समोर आली तर सर्वसामान्य जनता आपल्या तोंडात बोटच नव्हे तर पुर्ण हात टाकून घेईल.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेनंतर या व्यंकटराव तरोडेकर मार्केटमधील घोळ बाहेर आले. रिट याचिका क्रमांक 74/98 आणि 7516/2021 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल होत्या. या दोन याचिकांची सुनावणी न्यायमुर्ती एस.व्ही.गंगापुरवाला आणि न्यायमुर्ती आर.एन.लढ्ढा यांच्या समक्ष झाली. या इमारतीबद्दल मिळालेल्या या याचिकेतील माहितीनुसार या इमारतीची निवदा काढली तेंव्हाच या इमारतीतील जुन्या लोकांचे पुर्नवसन करणे आवश्यक होते. तसा महानगरपालिकेने निविदा करार केलेला आहे. या इमारतीमध्ये तयार होणारा तळमजला आणि आणि अंडरग्राउंड विकता येणार नाही पण याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार अंडरग्राऊंडमध्ये 520 चौरस मिटर वाहन तळ नियोजित असतांना त्यात 7 दुकाने काढण्यात आली आहेत आणि त्यांची विक्री झाली आहे. कंत्राटदाराला पहिला, दुसरा आणि तिसरा मजलाच विक्री करता येतो. या इमारतीतील जुन्या लोकांसाठी 577 स्केवअर मिटरची जागा पुर्नवसनासाठी प्रस्तावित होती. सोबतच या इमारतीत 42 ओटे भाजीपाला विक्रेत्यांसाठी आहेत. भाजी पाला विक्रेत्यांचे ओटे कमी करून त्यात दोन दुकाने वाढविण्यात आली आहेत. जाहिरातीमध्ये 212 दुकानांच्या विक्रीचा उहापोह कंत्राटदाराने केला आहे. पण निविदेतील करारानुसार फक्त 135 दुकाने विक्री करण्याची मुभा कंत्राटदाराला आहे.
याचिकाकर्त्याने सांगितल्याप्रमाणे या इमारतीचा तळमजला जवळपास 2 कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यात आला आहे. तसेच अंडरग्राऊंड भाग 1.25 कोटीमध्ये विकण्यात आलेला आहे. भाजी विक्रेत्यांची मुळ जागा ऐवढी होती. त्यापेक्षा छोटे 40 ओटे तयार करण्यात आले आहेत. ते सुध्दा पहिल्या मजल्यावर आहेत. भाजीमार्केटला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता असावा असे या करारत नमुद आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. या इमारतीत तयार करण्यात आलेली पाण्याची सोय या इमारतीच्या संरचनेनुसार पुरेशी नाही असे याचिकाकर्ते सांगतात. कांही दिवसांपुर्वी ऍड. अनुप आगाशे यांनी व्यंकटराव तरोडेकर मार्केटचे बांधकाम हे नकाशाविरुध्द आहे ते पाडण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. पण ही मागणी पुर्ण करणार कोण कारण या इमारतीमध्ये नावासाठी कंत्राटदार बियाणीचे नाव आहे पण त्यासोबत अलिखित भागीदारांची संख्या सुध्दा मोठी आहे असे याचिकाकर्त्यांनी सांगितले.
नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाची संपत्ती विविध कंत्राटदारांच्या घशात टाकून त्यांच्या कुटूंबातील सात पिढीचे भले करण्याचे वृत्त घेतलेल्या महानगरपालिकेने आता याच्यात काय करायची गरज नाही. जे झाले ते झाले आहे कंत्राटदार 99 वर्षांच्या लिजवर ही दुकाने विक्री करत आहे. आपल्या भाकरीवर भरपूर तुप ओढून घेणार आहे. आपल्या भागिदारांना सुध्दा त्यातील थोडे-थोडे तुप वाटणार आहे. बळी गेला तो नांदेड महानगरपालिकेतील सर्वसामान्य माणूस जो मागे कधी काळी या इमारतीचा मालक होता.
व्यंकटराव तरोडेकर मार्केटमध्ये अनेक घोळच घोळ; महानगरपालिकेने मालक असलेल्या सर्वसामान्य नागरीकाला रस्त्यावर आणले