नांदेड(प्रतिनिधी)-फटका विक्रेत्यांविरुध्द चुकीचा अर्ज देवून खंडणी मागणाऱ्या एकाने पिस्तुल काढून तुझे ठोक दुंगा असे म्हणाऱ्यासह अर्ज देणारा आणि आणखी एक अशा तिघांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न या सदरात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या संदर्भाने कोण्या सुर्याजी पिसाळाचे समर्थक सुध्दा यात गुंतलेले आहेत काय याचा शोध नांदेड शहरातील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी लावावा आणि खऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वास्तव न्युज लाईव्हने या घो टाळा बहादर आणि माहिती अधिकारानुसार जगाचे भले करण्यासाठी निघालेल्यांबाबत अनेकदा लिखाण केलेले आहे.
माहिती अधिकाराचा वापर करून जगाला सुधारण्यासाठी व्रत घेतलेल्या दत्तात्रय अनंतवार या माणसाने वजिराबाद पोलीस ठाण्यात फटके विक्री करणारी मंडळी चायना व बनावट फटके विक्री करीत आहे असा अर्ज दिला. या अर्जानंतर कांही जणांनी फटाके विक्रीचे स्टॉल गाठले. तुमची चौकशी न लावण्यासाठी त्यांनी 40 हजार रुपये खंडणी मागितली. त्यावेळी फटाका विक्रेत्यांनी आमच्याकडे कांहीच बनावट फटाके नाहीत, आम्ही चायनाचे फटाके विकत नाही असे सांगितले तेंव्हा पवन जगदीश शर्मा (बोरा) याने पिस्तुल काढून फटका व्यापारी धनराज बद्रीनारायण मंत्री (46) या क्रॅकर असोसिएशनच्या अध्यक्षाकडे पिस्तुल रोखून ठोक दुंगा असे म्हणाला. हा पिस्तुल रोखण्याचा प्रकार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेदरम्यान घडला.
आपण कांही चुकीचे करत नाही, तरी आपल्यावर आरोप होत आहेत., मेहनत आम्ही घ्यावी आणि फुकटात पैसे माहिती अधिकारवाल्यांना द्यावेत याबद्दल धनराज मंत्री यांनी भरपूर विचार केला. त्यानंतर त्यांनी अर्ज देण्याची तयारी सुरू केली. नांदेड शहरातील कोणी तरी मोठ्या वकीलांनी धनराज मंत्रींना घडलेल्या घटनेनुसार अर्ज लिहुन दिला. धनराज मंत्री यांच्यावर अनेक प्रकारे दबाव आणण्यात आले की, त्यांनी असा अर्ज देवू नये. या प्रकरणात पवन बोरा जवळ पिस्तुल आहे ही बाब सर्वात महत्वपूर्ण आहे. ज्या समितीचे अस्तित्व नाही त्या समितीचा प्रदेशाध्यक्ष असलेल्या पवन बोराने सुध्दा पोलीस ठाणे वजिराबादमध्ये अर्ज दिलेला आहे. या अर्जावर संस्थचे नाव आहे. पण ही संस्थाच अस्तित्वात नाही हे न्यायालयासमक्ष तयार झालेल्या अभिलेखात नमुद आहे.
या प्रकरणात धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी 2 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी 19.34 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 17 प्रमाणे गुन्हा क्रमांक 397/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 386, 452, 114, 504 आणि 506 सोबत भारतीय हत्यार कायद्याची कलमे 3/25 आणि 30 नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात पवन जगदीश शर्मा(बोरा) रा.व्यंकटेश अपार्टमेंट मो.नं.9923872323 आणि दत्तात्रय अनंतवार रा.नांदेड यांच्यासह आणखी एकाचे नाव आहे ते नाव समजले नाही.
या प्रकरणात नांदेड जिल्ह्यात कार्यरत सुर्याजी पिसाळ सारखे कोणते व्यक्ती या प्रकरणातील आरोपींचे पाठीराखे आहेत याचा शोध शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक नक्कीच घेतील असा विश्र्वास व्यक्त होत आहे. वास्तव न्युज लाईव्हने अशा प्रकरणांना आपल्या वृत्तातून अनेकदा प्रसिध्द केले आहे. त्यामुळे सुपारी देवून वास्तव न्युज लाईव्हच्या लोकांवर गेम करण्याची तयारी कांही नतदृष्टांनी सुरू केली आहे. देवाने मृत्यू लिहिला असेल तर तो कोणी टाळू शकत नाही आणि नसेल लिहिला तर कोणी मारू शकत नाही या धर्माच्या व्याख्येवर विश्र्वास ठेवून आम्ही नेमीच सत्य लिहिणार आहोत अशी ग्वाही आम्ही आमच्या वाचकांना देत आहोत.
माहिती अधिकाराचे व्रत घेवून जगभरमिरवणाऱ्यांविरुध्द जीवघेण्याचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल