
दि.3 नोव्हेंबर रोजी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात धनराज बद्रीनारायण मंत्री या फटका व्यापारी असोसिएनच्या अध्यक्षाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाला. या गुन्ह्यात आरोपीच्या सदरात दत्तात्रय पांडूरंग अनंतवार, पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा आणि गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन अशा तीन जणांची नावे आहेत. तक्रारीनुसार फटका दुकानांची चौकशी लावायची नसेल तर 40 हजार रुपये खंडणी मागण्यात आली होती. जिल्ह्यात आणि राज्यात अनेक लोकांविरुध्द चौकशा लावणे, अर्ज करणे आणि नंतर त्याची “मांडवली’ करणे असा या तिघांचा व्यवसाय आहे. ही बाब पोलीसांनी जारी केलेल्या गुन्ह्यांची यादी पाहिल्यावर लक्षात येते. गुन्हा दाखल झाला आणि इतरांना जेलमध्ये टाकणारे स्वत: फरार झाले. गौतम जैनने एक व्हिडीओ तयार करून सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल केला आणि मदतीची मागणी केली. या व्हिडीओमध्ये गुन्हा खोटा आहे असे गौतम जैन सांगतो. गुन्हा खोटा दाखल झाला असेल तर त्याबाबत कायदेशीर लढाई आहे. व्हिडीओमुळे हा लढा जिंकता येत नसतो असे मत कायदा जाणणाऱ्यांचे आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. रवि वाहुळे या प्रकरणाचा योग्य छडा लावतील अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रवि वाहुळे यांच्याकडे हा गुन्हा तपासासाठी देण्यात आला आहे. त्यांना सुध्दा दिलेली जबाबदारी पुर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेली एक माहिती खळबळजनक आहे. काल दि.6 नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक 397 मधील एक आरोपी पवन जगदीश बोरा हा नांदेड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी गेला आणि एका मॉलमध्ये जावून काजू बदामची पाकिटे घेतली. तेथील माणसाने बील देण्यासाठी सांगितले तेंव्हा मला वर खरेदी करायची आहे म्हणून पवन बोरा वरच्या मजल्यावर गेला. तेथून अजून कांही सामान हातात घेतले आणि थेट दुकानाच्या बाहेरच निघाला. दुकानातील माणसे त्याच्या मागे आली तेंव्हा माझी गाडी आहे गाडीत पैसे आहेत असे सांगत होता. कांही पोलीसांना त्या लोकांनी सांगितले तेंव्हा त्यांनी पोलीस ठाण्याला कळवले. पोलीस ठाण्याची गाडी आली आणि पवन बोराला घेवून गेली. दुकानदाराला पवन बोरा बद्दल काय माहिती असेल त्याचे वागणे, त्याचे बोलणे, त्याची वर्तणूक दुकानदाराला 25 पैसे कमी असल्याची कल्पना देवून गेली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुकानदाराने आपले साहित्य परत मिळवले. तक्रार दिली नाही. त्यावेळी पोलीसांनी हा नांदेडचा आहे असे सांगतो आहे याला अर्धातास बसवून नंतर नांदेडकडे पाठवून देवूत असे दुकानदाराला सांगितले आणि दुकानदार परत गेला.
रात्री 9 च्यासुमारास पवन बोरा या दुकानदाराकडे परत गेला. झालेल्या घटनाक्रमाबद्दल माफी मागितली आणि त्या दुकानदाराला विनंती केली की, मला नांदेडला जाण्यासाठी टॅक्सी करून द्या. पण दुकानदाराने त्याला हात जोडले. त्यानंतर हा पवन बोरा या शहरातील एका नगरासमोर तीन बॅग घेवून रस्त्यावर उभा असलेला लोकांनी पाहिला. ऐवढेच नव्हे तर आज दि.7 नोव्हेंबरच्या सकाळी फक्त अंतर वस्त्रांवर हा पवन बोरा जो लोकांना ठोकून टाकणारा आहे हा रस्त्यावर उभा होता. वाचकांनी या सर्व घटना क्रमातून काय घ्यावे आणि काय घेवू नये हा मुद्दा आम्हाला मांडायचा नाही.
याच पवन बोराला नांदेड जिल्ह्यात अनेक विभागातील अधिकऱ्यांनी आपल्या कक्षात तासन तास बसवून ठेवलेले आहे. अनेकांचे त्याच्यासोबतचे फोटो उपलब्ध आहेत. गुन्हा दाखल झाला तर फरार झालेला आरोपी लपून राहिल. पण पण बोरा अंतर वस्त्रांवर रस्त्यावर उभा राहतो यानंतर तरी कांही शिकवण घेण्याची गरज आहे. कोणाच्या पाठबळावर या पवन बोराने अर्जांचे धंदे केले त्याचाही माग तपासीक अंमलदार रवि वाहुळे काढतील अशी अपेक्षा आहे.
