
नांदेड(प्रतिनिधी)-एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या इंडिया वन या कंपनीच्या कर्मचाऱ्याला बनावट पिस्तुल दाखवून साडे तीन लाख रुपये लुटल्याचा प्रकार अर्धापूर गावात आज दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 2.30 यावेळेत घडला आहे.
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या अर्धापूर तालुक्यातील नांदेड नागपूर महामार्गावर तामसा चौक आहे. या चौकात वानखेडे व्यापारी संकुल आहे आणि या संकुलात एटीएम सेंटर आहे. आज दुपारी 2 ते 2.30 वाजेदरम्यान एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या खाजगी कंपनी इंडिया वनचे कर्मचारी तेथे पोहचले. त्यातील मुख्तारोद्दीन मोईनोद्दीन हे एटीएममध्ये पैसे टाकतांना एका दुचाकीवर दोन दरोडेखोर आले आणि त्यांनी मुख्तारोद्दीनला एका बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील साडे तीन लाख रुपये असलेली बॅग बळजबरीने चोरून नेली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्यासह अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी भेट दिली. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नांदेड शहरात आणि जिल्ह्यात बंदुकीचा धाक दाखवून चोऱ्याचे प्रकार भरपूर वाढले आहेत. त्यातील हा एक प्रकार आज घडला.