“आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला’ नांदेड जिल्हा पोलीस दलातील प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे कसूरी अहवाल पाठविण्याचा एक छंद सुरू झाला आहे. एका गारुड्याच्या पुंगीवर नाचणारा एक नाग तयार झाला आहे. त्यामुळे फुकटच्या कसुरी अहवालांमुळे पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार वैतागले आहेत. या कसुरी अहवालांवर काय निर्णय होईल हा वेगळा विषय आहे  पण कागदाला कागद जोडला जातो आणि खाली पडलेले शेण कांही तरी घेवूनच उठते या वाक्यांना चुकीचे म्हणता येणार नाही. अर्थात “आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला’ असा प्रकार नांदेड जिल्हा पोलीस दलात सुरू झाला आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाची अवस्था कांही ठिकाणी भरीव असली तरी कांही ठिकाणी ती मागे पडत चालली आहे. ज्यांच्यामुळे गुन्हे घडले त्यांना कांहीच विचारणा झाली नाही तर उलट सर्वात शेवटच्या माणसांचा बळी दिला गेला असे प्रकार घडले. आपले कार्यक्षेत्र नसतांना दुसऱ्या कार्यक्षेत्रांमध्ये आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न कांही जण करतात त्यात त्यांची पिट्टू मंडळी कार्यरत असते. कांही जण तर सुर्याजी पिसाळांचे लिखाण छापले नाही तर त्याबद्दल दु:ख सुध्दा व्यक्त करतात. आमच्या लिखाणापेक्षा त्यांच्या विभागात सुर्याजी पिसाळांची किती ख्याती झाली आहे. कांही जण प्रत्येक गुन्ह्याची फाईल माझ्यासमोरच आली पाहिजे असे सांगून त्या प्रकरणातील आरोपींकडून मोदक जमा करण्यात मस्त आहेत. तसेच ज्या कामाशी ज्या व्यक्तीचा कांही एक संबंध नसतो त्याची विचारणा त्याच्याकडे होत आहे. हा सर्व प्रभाव म्हणजे एका गारुड्याच्या पुंगीवर साप नाचतो अशाच प्रकारे सुरू आहे. कांही दिवसांपुर्वी एका गुन्हेगाराला उपरती झाली. या प्रकरणाचा मागोवा काढला तेंव्हा त्या प्रकरणात ऐकलेले सत्य सुन्न करणारे आहे.
पोलीस विभागात एखादे काम करतांना त्याची नियमित एसओपी आहे. या एसओपीला फाटा देवून नव्या प्रकारच्या एसओपी तयार झाल्या आहेत. त्यामुळे लक्ष एकीकडे आणि बाण दुसरीकडे असा हा प्रकार सुरु झाला. त्यामुळे आपला ज्या कामाशी अर्था-अर्थी संबंध नाही अशा कामांमध्ये कागद काळे करण्याची वेळ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर आली आहे. त्यामुळे पोलीस दलात काम करतांना नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्रस्त झाले आहेत. खरे तर ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. तरच पोलीसांचे ब्रिद वाक्य खरे ठरेल , ते ब्रिद वाक्य म्हणजे, “सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ याला सत्य ठरवता येईल. उगीचच कोणी तरी पुंगी वाजवेल आणि कोणता तरी नाग त्यावर फणा उगारून उभा राहिल अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना काम करणे अवघड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *