नांदेड(प्रतिनिधी)-दोन जण अपघातात मरण पावले आहेत. दोघांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. एकाने गळफास घेवून जगाचा निरोप घेतला आहे आणि एक पाण्यात बुडून मरण पावला आहे अशा सहा जणांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू नोंदवण्यात आला आहे.
अर्धापूरजवळच्या बोरगाव रोड-येळेगाव शिवारात दि.4 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता एम.एच.26 बी.आर.5958 या दुचाकी गाडीवर बसून जात असतांना कोणी तरी त्यास मागून धडक दिली. या धडकेत येळेगाव ता.अर्धापूर येथील गंगाधर काळबा तांदुळकर (27) यांचा मृत्यू झाला आहे. दि.6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भगवान बाबा चौक येथे एका ऍटोला टिपर क्रमांक एम.एच.40 वाय3577 ने धडक दिली.त्यात धनेगाव येथील अब्दुल अलिम अब्दुल रजाक यांचा मृत्यू झाला आहे. दि.7 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्यासुमारास पिक नष्ट झाले आणि बॅंकेच्या कर्जाला कंटाळून दिग्रस ता.कंधार येथील शेतकरी धम्मानंद बळीराम सोनकांबळे (30) यांनी विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दि.19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतरच्या 3.30 वाजता बिनताळा ता.उमरी येथील देविदास चांदू डोंगरे (55) यांनी आपल्या शेतात कांही तरी विषारी औषध प्राशन केले. दि.6 नोव्हेंबर रोजी रात्री 10.15 ते 11.45 दरम्यान नायगावच्या एसबीआय बॅंकेत आनंदा महाजन रोडे (55) यांनी बॅंकेच्या लोखंडी खिडकीस नॉयलॉन दोरी लावून आत्महत्या केली आहे. मुगाव शिवारात शंकर गणपती कांगठी (27) हे 6 नोव्हेंबर रोजी मुगाव शिवारातील एका शेताच्या विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी गेले असतांना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले आणि बुडून मरण पावले आहेत. अशा प्रकारे गेल्या 24 तासात सहा जणांच्या मृत्यूची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे.
सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू