नांदेड(प्रतिनिधी)-बोरगाव ता.लोहा येथे एक घरफोडी झाली असून 59 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. नायगाव येथे एक घर फोडून 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 80 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण आणि लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू चोरी पकडण्यात आली आहे.
राजू विश्र्वनाथ स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.8-9 नोव्हेंबरच्या रात्री बोरगाव ता.लोहा येथील त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. परिस्थितीत चोरट्यांनी त्यांच्या घरातील पत्राची एक पेटी व सुटकेस चोरून बाजूच्या शेतात नेली व त्यातील सोन्याच्या दोन अंगठ्या आणि कानातील चार काड्या असा 59 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार किरपणे अधिक तपास करीत आहेत.
नायगाव येथील रोहिदासनगरमध्ये राहणाऱ्या राजू तुळशीदास वाघमारे यांच्यासह त्यांच्या आईच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 8-9 नोव्हेंबरच्या रात्री एकूण 45 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार ढगे अधिक तपास करीत आहेत.
शुभम संजय निवडंगे यांची 80 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एम.7081 ही 4 नोव्हेंबरच्या मध्यरात्री खोब्रागडेनगर भागातून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
कल्हाळ रस्ता येथे गोदावरी नदीच्या गाठावरून वाळू चोरी होण्याची तक्रार मंडळाधिकारी कोंडीबा माधवराव नागरवाड यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दिली आहे. तसेच थुगाव शिवारात वाळू चोरी होत असल्याची तक्रार मंडाधिकारी अनिल माधवराव धुळगंडे यांनी दिली आहे. नांदेड ग्रामीण आणि लिंबगाव या दोन पोलीस ठाण्यात वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन घरफोड्या, दोन ठिकाणी वाळू चोरी, एक मोटारसायकल चोरी