आक्षेपार्ह पोस्ट करू नका सायबर पोलीसांची करडीनजर
नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजी ईतवारा हद्दीत पोलीसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आणि नांदेड शहरातील एकूण चार पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या या दिवशच्या चार गुन्ह्यांमध्ये एकूण 34 आरोपींना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळे सहा पथक कार्यरत असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पत्रकारांना दिली. सोबतच सायबर पोलीस स्टेशन नांदेड हे करडी नजर सामाजिक संकेतस्थळावर ठेवत आहे त्यामुळे सर्वांनी कोणतीही पोस्ट प्रसारीत करण्याअगोदर विचार करावा आणि युवा मंडळीने असामाजिक कृत्य करण्यापासून दुर राहावे नाहीतर त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होणार होत असतो असे आवाहन निलेश मोरे यांनी केले आहे.
12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा येथील घटनेच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला नांदेडमध्येच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. या हिंसक वळणाला प्रतिउत्तर सुध्दा 13 नोव्हेंबर रोजी देण्यात आले. अनेकांनी केलेल्या बेछुट शब्दातील भाषणांमुळे हा हिंसाचार घडला. एका 3 हजार किलो मिटर परिसरात घडलेल्या घटनेचा निषेध करतांना घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि त्यास प्रतिउत्तर देणे हे त्यापेक्षा मोठे दुर्देवी आहे. ज्या-ज्या ठिकाणी बेकायदा कृत्य घडतात. त्या-त्या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही होतेच त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करून आमच्याच लोकांचे गळे कापणे हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही.
नांदेड शहरातील वजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर आणि नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या विविध घटनांसाठी चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. यामध्ये सर्वात मोठा प्रकार कायद्याच्या दृष्टीकोणातून इतवारा पोलीस ठाणयात घडला. ज्यामध्ये अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे आणि अनेक पोलीस अंमलदार जखमी झाले. या घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी या हिंसाचाराला हिंसेनेच प्रतिउत्तर देण्यात आले.
नांदेडच्या घटनेमध्ये एकूण 34 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 14 जणांना ईतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 284 मध्ये आज एक दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. एखादा गुन्हा घडणे, त्यात आरोपी अटक होणे, त्यांना पोलीस कोठडी मिळणे, नंतर न्यायालयीन कोठडीत जाणे, जामीन होणे, खटला चालणे आणि खटल्याचा निकाल येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये ज्याचे नाव या गुन्ह्यात गोवले गेले त्यांच्या भविष्याचा विचार करून पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात आज अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, युवकांनी या असंवैधानिक आणि गुन्ह्याच्या स्वरुपातील घटनांमध्ये सहभाग घेवू नये. कारण त्याचा परिणाम त्यांच्या भविष्यातील जीवनात होणार असतो. त्यामुळे असंख्य स्वप्न अपुर्ण राहतात आणि कुटूंबाला त्याचा सोस भोगावा लागतो.
निलेश मोरे यांनी सांगितले की, फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्विटर, व्हॉटसऍप अशा सर्व सार्वजनिक माध्यमांवर कोणतीही पोस्ट करतांना बारकाईने विचार करा कारण नांदेड सायबर पोलीस ठाणे त्यावर अत्यंत करडी नजर ठेवून आहे. सर्व सार्वजनिक माध्यमांना सुध्दा या बाबत सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिक विषय घेवून कोणतीही पोस्ट करू नका ज्यामुळे हिंसाचार वाढेल. आपल्याला कांही माहित असेल कि, कोणी अशी पोस्ट केली आहे त्याबाबतची माहिती पोलीसांना द्या, पोलीस समाजात शांतता नांदविण्यासाठीच मेहनत घेत आहेत. आपल्या जीवावर आलेला धोका सांभाळून सुध्दा सर्वच पोलीस कार्यरत आहेत. एकूणच घडलेल्या प्रकाराबद्दल दुर्देवी अशा शब्दात आपले वर्णन करून निलेश मोरे यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने समाजात शांतता नांदावी अशी अपेक्षा व्यक्त करतांना माहिती असणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
युवकांनी आपल्या भविष्यावर परिणाम होणार नाही अशा घटनांमध्ये सहभागी होवू नये-अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे